वैश्विक मानवी मूल्यांचे मानवतावादी राष्ट्रग्रंथ म्हणजे भारताचे संविधान- नितीन सरदार…

364

नागपूर: संविधानाचे स्वप्न आम्ही लोकांसमोर मांडले पाहिजे. देशातील अल्पसंख्यांक व मागासवर्गीयांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. संविधानिक मूल्यांनी आम्ही जगलो तरच भारत अखंड व एकात्म राहील. संविधानविरोधी वर्तणूक हा आत्मघात आहे. राष्ट्राला संघटीत, सुरक्षित व विकसित करणाऱ्या वैश्विक मानवी मूल्यांचा मानवतावादी विचार देणारे भारताचे संविधान हे जगातील सर्वात सुंदर असे राष्ट्रग्रंथ आहे, असे मार्मिक विचार दिनबंधू शिक्षण व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नितीन सरदार यांनी व्यक्त केले.

संविधान फाऊंडेशनच्या वतीने संविधानाच्या जनजागृतीसाठी आयोजित केलेल्या ‘संविधानाची शाळा’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत ‘वंचितांच्या वस्त्यांपर्यंत संविधान कसा पोहोचेल ?’ या विषयावर त्यांच्याशी प्रा. डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांनी संवाद साधला असता ते बोलत होते. यावेळी माजी सनदी अधिकारी व संविधान फाऊंडेशनचे संस्थापक इ. झेड. खोब्रागडे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून विजय बैले यांनी संवाद कार्यक्रमास सुरुवात केली.

पुढे बोलताना नितीन सरदार म्हणाले, आम्ही कोणत्या जाती-धर्माचे किंवा वर्गाचे आहोत यास यत्किंचितही महत्त्व नाही. आम्ही प्रथमतः भारतीय व अंतिमत: भारतीयच आहोत. संविधान प्रत्येक भारतीय नागरिकांस विकसित होण्यासाठी आभाळाएवढे बळ देते. संविधान कुणावरही दबाव आणत नाही. संविधान मानवी हक्क व कर्तव्यांसह मानवतेचा गौरव करते. बंदीगृहातून शांतीगृहाकडे, गुलामगिरीतून स्वातंत्र्याकडे आणि अंधारातून उजेडाकडे जाण्याचा सम्यक सन्मार्ग भारतीय संविधानात आहे. संविधानाचा सन्मान करणे व त्याप्रमाणे वागणे, हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. संविधान सांगत असताना आमचा उर आदराने, प्रेमाने व नम्रतेने भरुन आला पाहिजे. जगातील विविध राष्ट्रांशी आणि तेथील नागरिकांशी मैत्री आणि प्रेम करण्याचा पाया संविधानात आहे. संविधान विरोधी कृत्य करणाऱ्याला त्याच्या घरातही समर्थन मिळणार नाही, अशा प्रकारची संविधानिक मूल्य पेरणी व्हावी. संविधानाची वैश्विक मानवी मूल्ये आत्मसात करून जगणाऱ्याला शत्रूही उरत नाही. संविधानातील या सामर्थ्यामागे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची करुणा व प्रेम आहे, असे प्रतिपादन नितीन सरदार यांनी यावेळी केले.

संवाद कार्यक्रमाचा समारोप करताना माजी सनदी अधिकारी इ. झेड. खोब्रागडे यांनी संविधान शाळेची संकल्पना स्पष्ट केली. संविधान जागृती सोबतच समाजासाठी तळमळीने व बांधिलकीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची ओळख समाजाला व्हावी हा सुद्धा या आयोजनामागील एक हेतू आहे. लोकांच्या जीवनातील असुरक्षितता कमी करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे होण्याचे बळ देणे गरजेचे आहे. प्रत्येक नागरिकाला सन्मानपूर्वक जगता यावे यासाठी विविध माध्यमांचा वापर करून संविधानाचा जागर झाला पाहिजे. सर्वांच्या कल्याणाचा मार्ग सांगणारा सविधान हा देशाचा राष्ट्रग्रंथ असून संविधानाचा जागर हे राष्ट्रनिर्माणाचे व देश घडविण्याचे कार्य आहे. संविधान जागृतीच्या चळवळीत सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन इ. झेड. खोब्रागडे यांनी यावेळी केले.

*********