Homeचंद्रपूरकोरोनाची तिसरी लाट थांबविण्याकरिता तातडीने उपाययोजना करा- पालकमंत्री ना.वडेट्टीवार

कोरोनाची तिसरी लाट थांबविण्याकरिता तातडीने उपाययोजना करा- पालकमंत्री ना.वडेट्टीवार

चंद्रपूर दि.16 मे : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसतोय, कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक असून वाढत्या संसर्गाचा धोका वेळीच लक्षात घेऊन लहान मुलांसाठी 50 ऑक्सिजन युक्त बेड कार्यान्वित करण्याकरिता तातडीने उपाययोजना कराव्यात असे निर्देश राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी आज ब्रम्हपुरी येथे झालेल्या बैठकीत आरोग्य विभागाला दिलेत.

शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे आयोजित कोविड विषयक आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी, नगर परिषदेचे बांधकाम सभापती विलास विखार, उपाध्यक्ष अशोक रामटेके, पंचायत समिती सदस्य थानेश्वर कायरकर, नगरसेवक नितीन उराडे, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, तहसीलदार विजय पवार, नगर परिषद मुख्याधिकारी मंगेश वासेकर, पोलिस निरिक्षक मल्लीकार्जुन इंगळे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुभाष खिल्लारे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास दूधपचारे, खेमराज तिडके, लोनबले तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

पालकमंत्री ना. वडेट्टीवार म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरी तसेच ग्रामीण भागात तिसऱ्या लाटेवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. सध्याच्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही लहान मुलांमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय. त्यामुळे, या गंभीर समस्येकडे वेळीच लक्ष देऊन योग्य त्या उपाययोजना वेळीच करण्याची गरज आहे.

ब्रह्मपुरी तालुक्यातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये यासाठी 100 ऑक्सीजन बेड कार्यान्वीत करण्यात आले असून 33 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे तर 78 जम्बो ऑक्सिजन सिलेंडर ब्रह्मपुरी येथे प्राप्त झाले आहे. कोरोना उपाययोजनेसाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला लोकसंख्येच्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देणारा चंद्रपूर हा महाराष्ट्रातील एकमेव असा जिल्हा ठरला आहे.

गावात विलगीकरण कक्ष उभारणे व त्यात प्राथमिक सुविधा निर्माण करणे, त्यांना वैद्यकीय सेवा पुरवणे,आवश्यक साहित्य खरेदी करणे यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला लोकसंख्येच्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. त्या निधीचा वापर आरोग्य सोयी-सुविधेसाठीच करावा, निधीचा गैरवापर होता कामा नये,याची दक्षता घ्यावी अशा स्पष्ट सूचना ना.वडेट्टीवार यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!