वन्यप्राण्यांच्या संरक्षणार्थ जंगल क्षेत्राला लागून असलेल्या विहिरींना उंच कटघरे बांधण्यास वनविभागाने पुढाकार घ्यावा…#वन्यजीव प्रेमी अजय कुकडकर यांची मागणी…

0
190
Advertisements

नितेश खडसे (जिल्हा प्रतिनिधी)

प्रतिनिधी / गडचिरोली : पाण्याच्या शोधात आलेल्या ४ अस्वलांचा कटघरे नसलेल्या विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना ताडोबा वन्यजीव क्षेत्रात उघडकीस आली आहे. यामुळे वन्यजीव प्रेमींमधून हळहळ व्यक्त केली जात असून उन्हाळ्यात आशा घटना वारंवार घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Advertisements

यामुळे जंगलालगत असलेल्या शेतशिवारात विना कटघरे असलेल्या विहिरींना कटघरे बांधून वन्यप्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी वनविभागाने तसेच शेतकऱ्यांनीही पुढाकार घ्यावा अशी मागणी वन्यजीव प्रेमी अजय कुकडकर यांनी केली आहे.
उन्हाळ्यात पाण्याच्या पातळीत घट होते.

यामुळे जंगलातील पाणवठे, वन तलाव, नाले कोरडे पडतात. वनविभाग दरवर्षी कृत्रिम पाणवठे तयार करते. परंतु या माध्यमातून पाहिजे त्या प्रमाणात वन्य प्राण्यांची तृष्णा भागविली जात नाहीत. यामुळे असंख्य वन्य प्राणी पाण्यासाठी भटकंती करीत शेतातील विहिरी, नदी – नाले, तलाव आदींचा आसरा घेतात.

वन्यप्राणी जंगलाबाहेर पडल्यानंतर विहिरीमधील पाणी पिण्याचा प्रयत्न करतात. यावेळी खोल विहिरीत कोसळून त्यांना इजा होते किंवा गाळात फसून, पाण्यात बुडून मृत्यू होतो. उन्हाळ्यात बरेच शेतकरी कोणत्याही पिकांचे उत्पादन घेत नाहीत. यामुळे शेतात त्यांचे जाणे – येणे राहत नाही. यामुळे प्राणी कोसळून मृत्यू झाला तरी घटना उघडकीस येत नाही.

बहुतांश शेतकऱ्यांनी शेतातील विहिरीचे बांधकाम करतांना केवळ जमीनीला समांतर बांधकाम केले आहेत. तर काही शेतकऱ्यांनी नुसते विहीर खोदून ठेवली पण बांधकाम केलेले नाही. यामुळे पाळीव प्राणी, माणसे सुद्धा पडून मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. ही बाब गंभीर असून यामुळे वारंवार अशा घटना घडतच राहतील.

घटती वन्यजीवांची संख्या लक्षात घेता पर्यावरणास हानी पोहचू शकते यामुळे शेतकरी आणि वनविभागाने पुढाकार घेऊन विहिरींना कटघरे बांधण्यासाठी व वन्यजीव तसेच इतर प्राणहानी रोखण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी वन्यजीव प्रेमी अजय कुकडकर यांनी केली आहे.

*शासनाने सिंचन विहीर बांधकाम करतांना कटघरे बांधकाम करणे सक्तीचे करावे*

शेतीला सिंचनाची सोय व्हावी यासाठी शासनाच्या वतीने सिंचन विहीर ही योजना कार्यान्वित केली. परंतु शेतकरी बांधकाम करतांना जमिनीला समांतर असेच बांधकाम करतात. हे प्राणी आणि मानवाच्या दृष्टीने धोकादायक असून जमिनीपासून किमान ३ ते ४ फूट उंच कटघरे बांधकाम करणे आवश्यक आहे. यामुळे शासनाने शेतकऱ्यांना तशा सूचना कराव्यात किंवा तसे बांधकाम केल्याशिवाय देयके काढू नयेत अशी मागणीही अजय कूकडकर यांनी केली आहे.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here