Homeचंद्रपूरकोरोना नियोजनाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य पथक चंद्रपुरात दाखल...#प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिल्या...

कोरोना नियोजनाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य पथक चंद्रपुरात दाखल…#प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिल्या आवश्यक सूचना…

चंद्रपूर दि.10 एप्रिल : कोरोना विषाणूचा प्रसार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस बाधित रुग्णांची संख्या देखील वाढत आहे हा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात आरटीपीसीआर तपासण्या मोठ्या प्रमाणात वाढवाव्यात अशा सूचना केंद्रीय आरोग्य पथकाने जिल्हा प्रशासनाला दिल्या

चंद्रपूर महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रशासनाच्या कोरोना नियोजनाची पाहणी व केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक चंद्रपुरात दाखल झाले आहे.

दोन सदस्यीय पथकात एम्स, जोधपुरचे डॉ.निशांत चव्हाण यांच्यासह उपसंचालक, एनसिडीसी,दिल्लीचे डॉ. जयकरण यांचा समावेश आहे.

जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या कोरोना विषयक उपाययोजनांची केंद्रीय पथकाने प्रशंसा केली. तसेच आरटीपीसीआर चाचण्या वाढविण्यासाठी मायक्रोबायोलॉजीस्ट व मनुष्यबळ वाढविण्याच्या सूचना देतानाच कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग मोठ्या प्रमाणात वाढविण्यासही सांगितले. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णांचा मृत्यू होतो, त्यासाठी शरीरातील ऑक्सिजनची पातळी तपासणीसाठी पल्स ऑक्सीमिटर वाटपाचे निर्देशही केंद्रीय पथकाने दिलेत.

यावेळी केंद्रीय आरोग्य पथकाकडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील लसीकरण केंद्राची पाहणी करण्यात आली. जिल्ह्यातील लसीकरण मोहिमेची माहिती त्यांनी जाणून घेतली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात पार पडलेल्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कोरोना संसर्गाची संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्तकतेने उपाययोजना राबवत असल्याची माहिती. तसेच आरटीपीसीआर चाचण्यांही जिल्ह्यात सुरु असून रुग्णांचे वेळेत निदान होण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे सांगून श्री. गुल्हाने यांनी जिल्ह्यात पूरेशा प्रमाणात खाटांची व इतर अत्यावश्यक सुविधांची उपलब्धता ठेवण्यावर प्रामुख्यान भर देण्यात येत असल्याचे सांगितले.

जिल्ह्यात आढळणारे दैनंदिन पॉझिटिव्ह रुग्ण, होणारे मृत्यू, बरे झालेले रुग्ण व टेस्टिंग याबद्दलची माहिती सादर केली. तसेच तालुकानिहाय कोविड केअर सेंटरमध्ये उपलब्ध बेडची माहिती, त्यासोबतच जिल्ह्यात माझे कुंटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेतंर्गत आयएलआय व सारी रुग्णांचे सर्वेक्षण तसेच घरोघरी जाऊन गृहभेटी देणे आरोग्य विभागामार्फत सुरू आहे.

जिल्ह्यात उद्योगधंदे मोठ्या प्रमाणावर असून कामगार वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे इंडस्ट्रियल कंपन्यांमध्ये कामगारांची तपासणी मोहीम सुरु करण्यात आली.

आयईसी ऍक्टिव्हिटी अंतर्गत ग्रामस्तरावर सरपंच, नगरसेवक, ग्रामसेवक यांच्या माध्यमातून तसेच मेगाफोन, जिंगल्स याद्वारे कोरोना विषयक जनजागृती करण्यात आली. त्यासोबतच मास्क न लावणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई सुद्धा करण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील कंटेनमेंट झोन, होम आयसोलेशन मधील रुग्ण, जिल्ह्यात झालेले एकूण लसीकरण ही सर्व माहिती केंद्रीय पथकासमोर सादर केली.

या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अरुण हुमने, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश साठे, मनपा, वैद्यकीय अधिकारी डॉ. अविष्कार खंडाळे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम यासह आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

0 0 0

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!