मुलांची काळजी घेणे प्रत्येक नागरिकांची जबाबदारी- ॲड. संजय सेंगर…

589

सुरज पि. दहागावकर (उपसंपादक)

नागपूर: ‘बालक ही उद्याची राष्ट्राची संपत्ती आहे’ असे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू म्हणत. या राष्ट्रीय संपत्तीचे जतन करणे आज आवश्यक आहे. कारण दिवसेंदिवस बालक आणि त्याची सुरक्षा याबद्दल अनेक समस्या,प्रश्न निर्माण होत आहेत. यासाठी चाईल्ड गाईडेन्स अँड स्टुडेंट कॉन्सलिंग सेन्टर तिरपुडे समाजकार्य महाविद्यालय, नागपूर तर्फे ‘मुलांची काळजी आणि संरक्षण: नागरिकांची भूमिका’ या विषयावर राष्ट्रीय स्तरावर ऑनलाईन वेबिनारचे ३० मार्चला आयोजन करण्यात आले होते.

वेबिनारला प्रमुख मार्गदर्शक म्हणून बाल न्याय मंडळ, सदस्य अकोला चे ॲड..संजय सेंगर होते. आपल्या मार्गदर्शनात सेंगर यांनी विद्यार्थ्यांना अमूल्य असे मार्गदर्शन केले. सेंगर यांनी बालकांच्या कल्याणासाठी संविधानात मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाबद्दल तसेच वेठबिगारी सारख्या कायद्याची माहिती दिली. पुढे मुलांवर अत्याचार कसे होतात याबद्दल बोलतांना सेंगर यांनी आपण असे काही बोलतो ज्यातून मुलांचा आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता असते तसेच आपल्या अपयशाचे खापर आपल्या मुलांवर फोडल्याने मुलं निराश होतात. तेव्हा नागरीकांनी तसेच पालकवर्गाने याकडे लक्ष द्यावे असे सांगितले.

मुलांची काळजीबद्दल बोलतांना सेंगर यांनी बाल न्याय मंडळ, महिला व बालकल्याण विभाग, पोलीस, चाईल्ड लाईन, बाल कल्याण समिती, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, ग्रामसेवक, अंगणवाडी या यंत्रणा आहेत. तेव्हा नागरिकांनी या ठिकाणी अन्यायग्रस्त बालकांना न्याय मिळवून द्यायला पाहिजे असे मत व्यक्त केले. पुढे बोलतांना आपण मुलांवर विश्वास ठेवावा, मुलांशी संवाद साधत राहावे, यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढेल असे मत व्यक्त केले.

या वेबिनारला अध्यक्ष म्हणून तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.स्वाती धर्माधिकारी मॅडम उपस्थित होत्या. बालकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अनेक आवश्यक योजना आहेत. लहान बालकांवरील लैंगिक अत्याचारावर आळा घालण्यासाठी पोस्को सारखे कायदे आहेत ते समजून घेतल्यास नक्की बालकांवरील होणारे अन्याय अत्याचार कमी होईल, असे मत अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.

वेबिनारमध्ये सुरज दहागावकर आणि रोहिणी पवार यांनी बालकाच्या सुरक्षतेच्या संदर्भात सुंदर कवितेचे सादरीकरण करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

या वेबिनारचे प्रास्ताविक डॉ. शिल्पा पुराणिक मॅडम यांनी केले. प्रस्ताविकेतून त्यांनी आज देशात बालकांच्या संबंधित समस्यांची आकडेवारीवर प्रकाश टाकला. सूत्रसंचालन विद्यार्थी प्रतिनिधी स्वर्णिमा कमलकर, दिपांकर भोजने यांनी केले. तर आभार श्रुतिका अंजणकर यांनी मानले.

या वेबिनरला समस्त भारतातुन २०० च्या जवळपास नागरिक, समाजसेवक, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले. वेबिनारला यशस्वी करण्यासाठी तुषार हुकरे, वृषाली केकरे, श्रुतिका अंजणकर, सुरज दहागावकर, रोहिणी पवार, मुकुल पराते आणि इतरांचे सहकार्य लाभले…