गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ गडचिरोली येथेच संपन्‍न होणार…

566

जिल्हा संपादक प्रशांत शाहा
गडचिरोली: गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ चंद्रपूर येथे आयोजित न करता आता गडचिरोली येथेच हा समारंभ संपन्‍न होणार आहे. गडचिरोलीचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी या संदर्भात केलेल्‍या प्रयत्‍नांना यश प्राप्‍त झाले आहे.

गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ चंद्रपूर येथे आयोजित करण्‍यात येत असल्‍यामुळे गडचिरोली जिल्‍हयातील नागरिकांच्‍या तिव्र भावना लक्षात घेता हा समारंभ गडचिरोली येथेच विद्यापीठ परिसरात आयोजित करण्‍याची मागणी आमदार देवराव होळी यांनी माजी अर्थमंत्री तथा विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍याकडे केली. आज आ. होळी यांनी आ. मुनगंटीवार यांची भेट घेत त्‍यांना निवेदन सादर केले. आ. मुनगंटीवार यांनी राज्‍यपाल भगतसिंग कोश्‍यारी आणि कुलगुरु डॉ. श्रीनिवास वरखडी यांच्‍याशी दुरध्‍वनी द्वारे चर्चा केली. जनभावनेचा आदर करत दीक्षांत समारंभ गडचिरोली येथेच आयोजित करण्‍यात यावा अशी मागणी आ. मुनगंटीवार यांनी राज्‍यपाल व कुलगुरुंकडे केली. हा दीक्षांत समारंभ गडचिरोली येथेच आयोजित करण्‍यात येईल असे राज्‍यपाल आणि कुलगुरुंनी आ. मुनगंटीवार यांना सांगीतले.