Home Breaking News जिल्ह्यातील केंद्रबिंदू म्हणून ओळख असलेल्या रेगडी गावचा विकास खोळंबला…

जिल्ह्यातील केंद्रबिंदू म्हणून ओळख असलेल्या रेगडी गावचा विकास खोळंबला…

93

जिल्ह्यातील केंद्रबिंदू म्हणून ओळख असलेल्या रेगडी गावचा विकास खोळंबल.
प्रतिनिधी गौरव बुरांडे
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील रेगडी हे गाव परिसरातील महत्त्वाचे केंद्र मानले जाते. आसपासच्या अनेक गावांसाठी बाजारपेठ, वाहतूक आणि व्यवहारांचे मुख्य ठिकाण म्हणून रेगडीची ओळख आहे. मात्र एवढे महत्त्व असूनही गावातील विकासकामे वर्षानुवर्षे प्रलंबित राहिल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
रेगडी येथील बहुचर्चित विश्रामगृह सध्या पूर्णपणे जीर्ण अवस्थेत असून वापरण्यायोग्य राहिलेले नाही. प्रवासी, अधिकारी तसेच विविध कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांसाठी हे विश्रामगृह अत्यंत महत्त्वाचे होते. मात्र देखभाल आणि दुरुस्तीअभावी इमारत मोडकळीस आली आहे. याबाबत ग्रामस्थांनी वारंवार संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला असला तरी अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
याशिवाय, परिसरातील सर्वात मोठी बाजारपेठ असूनही रेगडी येथे अद्याप एकही राष्ट्रीयीकृत किंवा सहकारी बँकेची शाखा उपलब्ध नाही. यामुळे व्यापारी, शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक व्यवहारांसाठी दूरवर जावे लागते. शासनाच्या विविध योजना, अनुदान, शेतकरी लाभ, पेन्शन किंवा डिजिटल व्यवहार यासाठी बँक शाखा अत्यावश्यक असताना रेगडीसारख्या मध्यवर्ती ठिकाणी ती नसणे ही मोठी शोकांतिका असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे.
तसेच गावातील पायाभूत सुविधांबाबतही अनेक समस्या कायम आहेत. काही अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था, अपुरी सार्वजनिक सुविधा, तसेच प्रशासनाकडून विकास आराखड्याची अंमलबजावणी न होणे यामुळे गावाचा विकास ठप्प झाल्याचे दिसून येते. केंद्रबिंदू असलेल्या गावाचा असा विकास खुंटल्याने परिसरातील इतर गावांवरही त्याचा परिणाम होत असल्याची चर्चा आहे.
यामुळे संबंधित विभागांनी तातडीने लक्ष देऊन विश्रामगृहाचे पुनर्बांधकाम, बँक शाखा सुरू करणे, तसेच इतर प्रलंबित विकासकामे हाती घ्यावीत, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. प्रशासनाने वेळेत पावले उचलली नाहीत तर आंदोलनाचा इशारा सामाजिक कार्यकर्त उमेश मल्लिक,प्रकाश शाहा,अमित चक्रवर्ती यांनी दिला आहे. रेगडीसारख्या महत्त्वाच्या गावाचा सर्वांगीण विकास होणे ही काळाची गरज असल्याचे सर्वसामान्यांचे मत आहे.

Don`t copy text!