नवरगाव येथे भव्य रबरी बॉल क्रिकेट स्पर्धेचे जल्लोषात उद्घाटन; डॉ. देवराव होळी यांचे अध्यक्षीय मार्गदर्शन
प्रतिनिधी सतीश कुसराम
गडचिरोली – नवयुवक क्रिकेट क्लब, नवरगाव यांच्या वतीने आयोजित भव्य सटम्पर बॉल क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. देवराव होळी हे होते. त्यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
या उद्घाटन कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माजी खासदार अशोक नेते उपस्थित होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून माजी पंचायत समिती उपसभापती विलास दशमुखे, सरपंच सुनंदा दशमुखे, कृऊबा गडचिरोलीचे संचालक हेमंत बोरकुटे, ग्रामसेवक धनंजय शेंडे (नवरगाव), मार्कंडी आवारी, टिकाराम कोकोडे, उमाकांत चुधरी, राजन जांभुळकर, वसंत चुधरी, साहिल आवारी आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. होळी यांनी क्रिकेटसह विविध खेळांचे युवकांच्या आयुष्यातील महत्त्व अधोरेखित केले. खेळामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच संघभावना, शिस्त आणि नेतृत्वगुण विकसित होतात, असे सांगत त्यांनी युवकांना खेळात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
स्पर्धेला ग्रामस्थ व क्रिकेटप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, नवरगाव परिसरात क्रीडामय वातावरण निर्माण झाले आहे.







