Home Breaking News प्रशासनाचे दुर्लक्ष; विद्यार्थ्यांनी श्रमदानातून बुजवले कोसळलेल्या पुलाचे खड्डे…

प्रशासनाचे दुर्लक्ष; विद्यार्थ्यांनी श्रमदानातून बुजवले कोसळलेल्या पुलाचे खड्डे…

215

प्रशासनाचे दुर्लक्ष; विद्यार्थ्यांनी श्रमदानातून बुजवले कोसळलेल्या पुलाचे खड्डे

तालुका प्रतिनिधी आदित्य चिप्पावार एटापल्ली
गडचिरोली :- एटापल्ली तालुक्यातील एकरा बुजरुग गावाकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरील पुलांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून बांधण्यात आलेले पुल कोसळल्यामुळे ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. मात्र, या गंभीर समस्येकडे स्थानिक प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
दरवर्षीप्रमाणे भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे विविध ग्रामीण भागात सात दिवसीय श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात येते. यावर्षी हे शिबिर एकरा बुजरुग येथे आयोजित करण्यात आले होते. शिबिरासाठी जात असताना विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आलेल्या कोसळलेल्या पुलावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांना होत असलेला त्रास पाहून, राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी सामाजिक जबाबदारी स्वीकारत श्रमदानातून त्या खड्ड्यांमध्ये मुरुम, दगड व पाणी टाकून तात्पुरती डागडुजी केली.
स्थानिक पातळीवर शासनाच्या माध्यमातून अनेक विकासकामे मंजूर केली जातात; मात्र एकरा बुजरुग मार्गावरील पुलाचे खड्डे कायमस्वरूपी बुजवले जातील की नाही, याबाबत ग्रामस्थांमध्ये तीव्र अस्वस्थता आहे. प्रशासनाने तात्काळ एटापल्ली ते एकरा बुजरुग या मार्गाची दुरुस्ती करून पुलाचे पुनर्बांधकाम करावे, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे.
या मुख्य रस्त्याची झालेली दुरवस्था प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नजरेस पडत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. शासनाकडून निधी मंजूर होत असताना तो नेमका कुठे खर्च केला जातो, असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे. स्वयंसेवकांनी केलेली तात्पुरती डागडुजी पावसाळ्यात पाण्याची पातळी वाढल्यास वाहून जाण्याची शक्यता असून पुलाची अवस्था पुन्हा जैसे थे होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
सरकारने निधी न देण्याचा इशारा दिला तरीही स्थानिक पोलीस पाटील, ग्रामसेवक व सरपंच यांनी पुढाकार घेऊन शासनाकडे पाठपुरावा करून या ग्रामीण भागातील रस्त्याची व पुलाची दुरुस्ती करून घ्यावी, अशी मागणी होत आहे.
या उपक्रमावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रीय सेवा योजना विभागप्रमुख प्रा. डॉ. संदीप मैंद, सहाय्यक अधिकारी प्रा. चिन्ना पुंगाटी व प्रा. डॉ. श्रुती गुब्बावार यांच्या सहकार्याने पुलावरील खड्डे बुजविण्याचे काम करण्यात आले. या कार्यात सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेत सामाजिक कर्तव्य पार पाडले आणि उपक्रम यशस्वी केला.

Don`t copy text!