धानोरा कृषी केंद्रातील बेभाव विक्री प्रकरणी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची तातडीची दखल…

168

शेतकऱ्यांची फसवणूक केल्यास कठोर कारवाईचा इशारा

प्रतिनिधी सतीश कुसराम

दिनांक:- 31/08/2025

धानोरा :- तालुक्यातील कृषी केंद्रामध्ये IFFCO युरिया खत शेतकऱ्यांना शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त दराने विक्री करून अतिरिक्त वसुली केल्याची तक्रार स्थानिक शेतकऱ्यांकडून करण्यात आली होती. या गंभीर प्रकरणाची माहिती मिळताच गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी स्वतः धानोरा कृषी केंद्राला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.

या वेळी आमदार डॉ. नरोटे यांनी कृषी केंद्र चालकाला कठोर शब्दांत तंबी देत स्पष्ट केले की, शेतकऱ्यांची आर्थिक लूट, पीळवणूक अथवा फसवणूक कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही. शेतकऱ्यांना खत विक्री करताना शासनाने जाहीर केलेला दरच आकारला पाहिजे.कोणत्याही परिस्थितीत खताचा साठा करून काळाबाजार अथवा बेभाव विक्री होऊ नये.खताचे वितरण नेहमी अधिकृत विक्री खात्यामार्फत पारदर्शक पद्धतीने करणे बंधनकारक आहे. शेतकऱ्यांना वेळेत आणि योग्य दराने खत उपलब्ध करणे ही कृषी केंद्राची जबाबदारी आहे.

आमदार डॉ. नरोटे यांनी कृषी केंद्र चालकास थेट इशारा दिला की, “पुढील काळात जर पुन्हा शेतकऱ्यांची फसवणूक अथवा लूट झाली, तर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.”

यावेळी आमदारांनी उपस्थित अधिकाऱ्यांनाही सूचना दिल्या की, अशा प्रकारच्या घटनांवर काटेकोरपणे लक्ष ठेवावे आणि शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण व्हावे.

धानोरा परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी आमदार डॉ. नरोटे यांच्या या तातडीच्या हस्तक्षेपाचे स्वागत करत “शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नेहमी ठाम उभे राहिल्याबद्दल” त्यांचे आभार मानले.

यावेळी ज्येष्ठ नेते साईनाथजी साळवे, भाजपा तालुकाध्यक्ष साजनजी गुंडावार, ता. महामंत्री शुभाषजी धाईत, शुभाषजी खोबरे, राकेशजी दास, संजयजी कुंडू, कृषी अधिकारी पवनजी मडावी व सहकारी उपस्थित होते.