Home चंद्रपूर जिवती अखेर फुटलाच त्यांच्या सहनशिलतेचा बांध ! ग्रामपंचायतीवर धडकला संतप्तांचा घागर मोर्चा;...

अखेर फुटलाच त्यांच्या सहनशिलतेचा बांध ! ग्रामपंचायतीवर धडकला संतप्तांचा घागर मोर्चा; मोर्चा धडकला तेंव्हा ग्रामपंचायत कुलूपबंद

363

जिवती (ता.प्र.) : ग्रामपंचायत अंतर्गत येल्लापुर येथे कोट्यवधी रुपये खर्च करून जलजीवनच्या मिशन अंतर्गत मंजूर कामाला सुरुवात केली. मात्र, जलजीवनच्या अर्धवट कामामुळे मागील दीड ते दोन वर्षांपासून गावात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली. त्यामुळे उन्हाळ्याची चाहूल लागताच येल्लापुर वासियांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. यासंदर्भात अनेकदा संबंधितांना निवेदने दिली मात्र आजपर्यंत कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था झाली नाही. अखेर आज गुरुवारी गाववासियांच्या सहनशीलतेचा बांध फुटल्याने महिला पुरुषांनी चक्क ग्रामपंचायत मुख्यालयावर घागर मोर्चा काढला.

येल्लापुर ग्रामपंचायत अंतर्गत येल्लापुर, येल्लापुर खुर्द, गोंडगुडा व कोलामगुडा या चार गावांचा समावेश आहे. ग्रामपंचायत येल्लापुर येथे पाच हातपंप, सहा विहिरी असे पाण्याचे स्त्रोत असून फेब्रुवारीतच चार विहिरीतील पाण्याने तळ गाठला आहे. जलजीवन मिशनचे अर्धवट काम उन्हाळ्यापूर्वी पूर्ण करून पिण्याच्या पाण्याची व सांडपाण्याची कायमस्वरूपी सोय करण्याच्या मागणीचे निवदने गावकऱ्यांनी अनेकदा जिल्हाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांचेकडे दिलीत. शिवाय समक्ष अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन पाण्याची समस्या दूर करण्याची विनंती केली. मात्र येल्लापुर वासियांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली. अखेर येल्लापुर वासियानी ग्रामपंचायत मुख्यालयावर घागर मोर्चा काढत निषेध केला.
विशेष म्हणजे गावातून निघालेला घागर मोर्चा ग्रामपंचायत मुख्यालयापर्यंत पोहोचला तेंव्हा ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लावलेले दिसल्याने गावकरी संतप्त झाले. यावेळी गावकऱ्यांकडून ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्यावर रोष व्यक्त करत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली.

– ठोस उपाययोजनाच नाही
या भागात पावसाळ्यात दरवर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडतो. मात्र पाणी अडविणे, जिरवणे यासंदर्भात योग्य पाऊले उचलली नसल्याने तसेच पाण्याचे योग्य नियोजन नसल्याने उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. विशेष म्हणजे जलजीवनचे काम अर्धवट असल्याने तीव्र पाणी टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

 

कोट – गावकरी पाण्याच्या समस्या घेऊन माझ्याकडे येतात. आज संतप्त गावकऱ्यांनी पाण्यासाठी ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढला. मी ग्रामपंचायतला आले असता ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लावून होते. ग्रामपंचायत कार्यालयाची चावी माझ्याकडे नाही. ग्रामपंचायतचे शिपाई व ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायत अधिकारी यांचेकडे चावी आहे.
– सुमित्रा मेश्राम सरपंच, ग्रामपंचायत कार्यालय येल्लापुर.

 

कोट – दिनांक २५ फेब्रुवारीला झालेल्या ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत रमेश गायकवाड या शेतकऱ्यांच्या शेतातील विहीर अधिग्रहण करून पाण्याची व्यवस्था करण्याचे ठरविण्यात आले. व प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात सादर करण्यात आला आहे. यावेळी सरपंच, उपसरपंच व सदस्य उपस्थित होते. आज मी रजेवर असल्याने ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहू शकले नाही. ग्रा.पं.कार्यालयाची चावी ग्रा.पं.शिपायाकडे सरपंच व सर्व पदाधिकारी यांचे संमतीनेच ठेवण्यात आली आहे. पं.स.ला पाणीटंचाई बाबत सभा झाली त्या सभेला सरपंच व उपसरपंच कोणीही उपस्थित नव्हते.
– कु.स्मिता वऱ्हाडे, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रा.पं.येल्लापुर

Don`t copy text!