चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राचा अहवाल येत्या आठवडाभरात पक्षश्रेष्ठींकडे पाठविणार  चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे निरीक्षक डॉ. नितिन राऊत यांची माहिती

296

चंद्रपूर : काही दिवसापूर्वी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्रातील ४८ लोकसभा क्षेत्राच्या अभ्यासासाठी निरीक्षक आणि समन्वयक यांची नियुक्ती केली. यामध्ये चंद्रपूर-वणी-आर्णी या लोकसभा क्षेत्राचे निरीक्षक म्हणून डॉ. नितीन राऊत यांची नियुक्ती करण्यात आली होती. राऊत यांनी आज चंद्रपूर येथे आढावा बैठक घेतली. यामध्ये आगामी लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीने पूर्वतयारीचा आढावा घेतला असून पक्षसंघटन बांधणी, बूथ स्तरावर पक्ष मजबूत करण्यासाठी करावे लागणारे काम आणि स्थानिक प्रश्नांबाबत असलेली सजगता यावर आज कार्यकर्त्यांशी चर्चा झाली असून लवकरच विधानसभा क्षेत्र निहाय दौरा केल्यानंतर आठवडाभरात चंद्रपूर लोकसभा संदर्भातील अहवाल पक्षश्रेष्ठींकडे देणार असल्याची माहिती काँग्रेसचे पक्ष निरीक्षक माजी मंत्री आमदार डॉ.नितीन राऊत यांनी दिली.

 

अखिल भारतीय काँग्रेस कमेटी व प्रदेश काँग्रेस कमेटीने चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे पक्ष निरीक्षक म्हणून डॉ.नितीन राऊत यांची नियुक्ती केल्यानंतर ते आज पहील्यांदाच चंद्रपूर दौर्‍यावर आले होते. काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर ते येथील शासकीय विश्राामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांशी संवाद साधत असतांना, या क्षेत्राचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनामुळे पक्षाची मोठी हानी झाली आहे.त्यामुळे आता त्यांचे स्वप्न आम्ही पूर्ण करून अश्या भावना पक्ष कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्याचे डॉ.नितीन राऊत यांनी सांगीतले. मात्र आगामी लोकसभेसाठी काँग्रेसचा उमेदवार कोण राहील यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना डॉ.राऊत यांनी हा निर्णय पक्षश्रेष्ठींकडे राखीव असल्याचे सांगून आपल्याकडे सध्यातरी प्राथमिक स्तरावर पक्षसंघटन बांधणी व बूथपातळीवर पक्ष मजबूत करणे हे महत्वाचे काम असल्याचे सांगीतले.

 

पक्षातंर्गत सुरू असलेल्या गटबाजीबद्दल बोलतांना राऊत म्हणाले की, गटबाजी ही केवळ काँग्रेसमध्येच नाही तर अन्य पक्षातही आहे आणि गटबाजी म्हणजे पक्ष जिवंत असल्याचे लक्षण समजावे असेही ते म्हणाले. राहुल गांधी यांना पंतप्रधान म्हणून बघायचे असल्याने सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी गटबाजी न ठेवता कामाला लागणार असल्याचे त्यांनी सांगीतले. आजच्या दौर्‍यात सर्वांची मते जाणून घेतली. ज्या बूथवर आपल्या पक्षाची ताकद कमी आहे तीथे नियोजन करून पक्ष वाढविण्याच्या सूचना दिल्या.

 

गाव तेथे काँग्रेस अध्यक्ष नेमण्याचेही सांगीतले असून बूथ कमिट्या सक्षम करण्यावर प्राथमिकता असल्याची माहिती यावेळी डॉ. राऊत यांनी दिली. महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आ.विजय वडेट्टीवार हे चंद्रपूर जिल्ह्याचे असल्याने आता चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसची ताकद वाढणार आहे, यात शंका नसल्याचा शेराही सरतेशेवटी डॉ.नितीन राऊत यांनी मारला. यावेळी काँग्रेसचे निरीक्षक मुनिज पठाण, आ.प्रतिभा धानोरकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ.सुभाष धोटे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष रामू तिवारी, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, चंद्रपूर शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा वैरागडे, विनोद दत्तात्रय, नंदू नागरकर उपस्थित होते.

 

शरद पवार यांवी विश्वासार्हता सदैव संशयास्पद

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीमुळे महाविकास आघाडीमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. विचारांच्या लढाईत शरद पवारांनी महाविकास आघाडीसोबत रहावे व ते राहतील मात्र तरीही पवारांच्या राजकीय हालचालीवर काँग्रेस पक्ष लक्ष ठेऊन आहे, अशी माहिती यावेळी डॉ.नितीन राऊत यांनी दिली. शरद पवार हे महाविकास आघाडीचे नेते आहेत. मात्र सध्या राज्यात सुरू असलेल्या चर्चेवर बोलतांना डॉ.नितीन राऊत म्हणाले की, शरद पवार यांची विश्वासार्हता नेहमीच संभ्रमात राहीली आहे. त्यांची विश्वासार्हता राहीली नसल्याचे यावेळी डॉ.नितीन राऊत म्हणाले. ज्या घटना घडायला नकोत त्या घडू लागल्याने ही संभ्रमावस्था निर्माण झाली असल्याचेही राऊत म्हणाले.