वाहनाच्या डिक्कीतून चोरले १३ हजार रुपये….. सीसीटिव्ही कॅमेरे बंद; आझाद बागेतील पार्किंगमधील घटना

383

चंद्रपूर: शहराच्या मध्यभागी असलेल्या मौलाना अबुल कलाम आझाद बागेत फिरायला आलेल्या महिलेच्या वाहनाच्या डिक्कीतून १३ हजार रुपये असलेली पर्स चोरट्याने लांबविली. ही घटना शुक्रवारी (ता. १६) सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. विशेष म्हणजे, बागेत सुरक्षेच्या दृष्टीने लावण्यात आलेले सीसीटिव्ही कॅमेरे बंद असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

शहरातील घुटकाळा वॉर्डातील मीनाक्षी राजेश अलोने (वय ४३) ही महिला आज सकाळच्या सुमारास आझाद बागेत मार्निंग वॉकसाठी आली. नेहमीप्रमाणे एमएच ३४ बीवाय ५५२३ क्रमांकाची दुचाकी पार्किंगमध्ये ठेवली. बागेत फिरून झाल्यानंतर दुचाकीने ती घराकडे निघाली. रस्त्यातील दुकानात वस्तू खरेदीसाठी थांबली असता वाहनाच्या डिक्कीत १३ हजार रुपये असलेली पर्स आढळून आली नाही. त्यामुळे सदर महिलेने शहर पोलिस ठाणे गाठून चोरीची तक्रार दाखल केली. वाहन पार्किंग केली असता तेथे एक युवक होता, असे त्या महिलेचे म्हणणे आहे.
तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. बगीचातील सीसीटिव्ही कॅमेरे बघितेल असता ते बंद आढळून आले. यामुळे फिरायला येणाऱ्या नागरिकांनी संताप व्यक्त केला. याप्रकरणी शहर पोलिस पुढील तपास करीत आहेत.