गडचांदूर : चिकण, मटनच्या दुकानातील साहित्य इतरत्र फेकले जात आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. नगरपरिषद प्रशासनाने दुर्गंधी करणाऱ्यांवर कारवाई करावी. दुकाने वस्तीतून अन्यत्र हलवावी, अशी मागणी करण्यात आली. परंतु, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे शहरातील वॉर्ड क्रमांक दोन येथील रफिक निजामी यांनी शुक्रवारी (ता. १६) नगरपरिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या कक्षात आणि कार्यालयात मृत कोंबड्या फेकून संताप व्यक्त केला. या प्रकारामुळे काही काळ चांगलाच गोंधळ उडाला होता.
गडचांदूर नगरपरिषदेत मुख्याधिकारी नाही. प्रभारी मुख्याधिकाऱ्यांकडे प्रभार होता. मागील काही दिवसांपासून हे पदसुद्धा रिक्त आहे. त्यामुळे शहरातील विकासकामे प्रभावित झाली आहेत. स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे तयार झाले आहेत. रफिक निजामी यांचे वॉर्ड क्रमांक २ येथे घर आहे. त्यांच्या घराजवळ
चिकण, मटनची दुकाने आहे. या दुकानातील साहित्य लगतच्या मोकळ्या जागेत फेकल्या जात आहे. यामुले परिसरात दुर्गंधी पसरत आहे. सततच्या दुर्गंधीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मागील अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. परंतु, नगरपरिषदेचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने चिकण, मटन दुकान मालकांकडून करण्यात आलेली घाण साफ करण्यात यावी, अशी मागणी रफिक निजामी यांनी पदाधिकारी, कर्मचाऱ्यांकडे तोंडी तक्रारीतून केली. परंतु, निजामी यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले. अखेर, प्रशासनाविरोधातील संताप निजामी यांनी नगर परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या कक्षात आणि इतर कर्मचाऱ्यांच्या कार्यालयात मृत कोंबड्या, आतड्या व अन्य कचरा फेकून व्यक्त केला. या प्रकारानंतर सूरज जाधव यांच्याकडे मुख्याधिकारीपदाचा प्रभार सोपविण्यात आला आहे. या घटनेने नगरपरिषद कार्यालयात मोठी खळबळ उडाली. परंतु, वृत्तलिहिस्तोवर नगर परिषद प्रशासनाकडून पोलिसात तक्रार करण्यात आली नाही.
स्वताच्या ठरावाचा विसर
नगरपरिषेदत १६ मार्च २०२० रोजी सभा पार पडली. या सभेत शहरात वेगवेगळ्या ठिकाणी असलेली चिकण, मटणची दुकाने एका ठिकाणी हलविण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. परंतु, तीन वर्षांचा काळ लोटूनही नगरपालिकेला जागेचा शोध घेता आला नाही. तसेच पदाधिकाऱ्यांतील आपसी मतभेदसुद्धा याला कारणीभूत ठरले असल्याची चर्चा आहे. नगरपालिकेने चिकण, मटनची दुकाने हलविली असती, तर आजचा प्रकार घडला नसता.
घरासमोरील घाणीमुळे मी आणि परिसरातील नागरिक त्रस्त आहोत. दुर्गंधीमुळे तेथे वास्तव्य करणे कठीण झाले आहे. घाण साफ करावी, अशी अनेकदा तोंडी मागणी केली. दूरध्वनीवर तक्रारी नोंदविल्या. परंतु, कोणीही या समसेकडे लक्ष देत नव्हते. त्यामुळे नाईलाजास्तव मृत कोंबड्या आणि कचरा टाकावा लागला. यातून नगरपरिषदेला जाग येईल आणि दुर्गंधी साफ करेल, हा उद्देश होता.
– रफिक निजामी,
कचरा फेकणारा त्रस्त नागरिक






