चंद्रपूर : जेव्हाजेव्हा देशात कट्टरतावादी सरकार सत्तेत येते. तेव्हा देशातीला बहुसंख्येने असलेला हिंदू बांधव धोक्यात सापडतो. देशात धार्मिक तेढ, जातीय दुरावा निर्माण करून दंगली घडविण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. देशात २०१२-१३ पर्यंत देशातील हिंदू धोक्यात नव्हते. मात्र, २०१४ पासून देशातीला हिंदूबांधव धोक्यात आहे. देशात शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी आणि देशाची जात धर्मापलीकडे जाऊन प्रगती करण्यासाठी कट्टरतावाद्यांना सत्तेच्या बाहेरचा रस्ता दाखविण्यासाठी बहुजन समाजाने ताकदीने एकत्र येणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले.
श्री संताजी विचार मंचातर्फे शनिवारी (ता. ८) मनपाच्या प्रांगणावर बहुजनांचा संघर्ष आणि दिशा आणि एकपात्री नाट्यप्रयोग भाकर पार पडले. त्याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. याप्रसंगी प्रसिद्ध वक्त्या अॅड. वैशालीताई डोळस यांची उपस्थिती होती. याप्रसंगी मुख्य आयॊजक सूर्यकांत खनके, धनोजे कुनबी समाज मंदीर अध्यक्ष अॅड. पुरूषोत्तमजी सातपुते, सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंट अध्यक्ष बळीराज धोटे, डॉ.संजय घाटे, चंद्रपूर ग्रामीण काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, चंद्रपूर जिल्हा शहर जिल्हाध्यक्ष रितेश तिवारी, माजी नगरसेवक प्रशांत दानव, जनविकास सेना अध्यक्ष पप्पू देशमुख, बाळू खोब्रागडे, हिराचंद्र बोरकुटे, प्रा.डॉ. ईसादास भडके, प्रा.शिंदे, पी.आर.बोरकर, संगीता अमृतकर, चंदाताई वैरागडे, जावेद शेख, प्रा. बोबडे, अनुताई दहेगावकर,माजी नगरसेवक नंदू नागरकर, शालिनीताई भगत, दौलत चालखुरे, डोंगरे, अजय वैरागडे, शैलेश जुमडे,जितेंद्र इटनकर, राजेंद्र राघाताटे, आकाश साखरकर, नीलेश बेलखेडे, देविदास दानव, गोविल मेहरकुरे, गोपाल अमृतकर, योगेश दुधपचारे, योगेश देवतळे, नरेंद्र जोरगेवार, आनंद अंगलवार यांची उपस्थिती होती. प्रारंभी मंचावरील सर्व मान्यवरांचा ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला. अॅड. वैशालीताई डोळस आणि महेंद्र गोंडाने यांना खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.दीपप्रज्वलन झाल्यानंतर महेंद्र गोंडाने नागपूर लिखित एक पात्री नाट्य भाकर सादर करण्यात आले.
*मनुस्मृती व्यवस्था लागू करण्याची प्रक्रिया ः अॅड. वैशाली डोळस*
अॅड. वैशाली डोळस यांनी बहुजनांचा संघर्ष आणि दिशा या विषयावर बोलताना म्हणाल्या की, बहुजन समाजाला वर्ण व्यवस्थेच्या चाकोरीबद्ध व्यवस्थेने बहुजन समाजाचे मेंदूच बिनकामी केले आहेत. समता. बंधुता, न्याय ही लोकशाहीची आधारभूत तत्वे वाचविण्यासाठी बहुजन समाज एकवटत नाही. कारण त्यांच्या डोक्यात वर्णव्यवस्थेचे भूत संचारलेले आहे. सरकारी कंपन्या कवडीमोल भावात भांडवलदारांना विकून सरकारी नोकऱ्या संपवून बहुजन समाजातील युवकांना देशोधडीला लावण्याचे काम जाणीवपूर्वक केले जात आहे.त्यामुळे आरक्षण बंद करण्याचे नानाविध प्रयत्न करण्यात येत आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी हातावर पोट असणाऱ्या कामगार-मजूर यांच्यासाठी जे कामगार कायदे केले. कामगारांना हक्क आणि अधिकार दिले होते. ते मोदी सरकारने रद्द करून कामगारांवर मनुप्रणित चार जाचक कायदे मंजूर करून कामगारांची क्रूर थट्टा केली आहे. शिक्षणाचे खासगीकरण होत आहे. शिक्षणाची दारेच नव्हे तर खिडक्या सुद्धा बंद करून बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून बेदखल करण्याचे घातक पाप केले जात आहे. नजीकच्या काळात सर्व सरकारी कारखाने बहुजन समाजाच्या धार्मिक भावनेचा फायदा घेत विकल्या जातील आणि बहुजन समाजाला कायमस्वरूपी गुलाम केले जाईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
बलुतेदारी सुरू करून मनुस्मृती व्यवस्था लागु करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.संविधानाप्रती उदासीनता दाखवून प्रश्न सुटणारे नाहीत हे बहुजन समाजाने आणि विशेषतः बहुजन युवकांनी लक्षात घ्यावे.भारतीय बहुजन समाजाच्या डोक्यात कट्टर धार्मिकतेचा किडा भरून संमोहित केले जात असल्यामुळे देशाची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली आहे, असेही त्या म्हणाल्या. विविध साम्राज्याचा आक्रमणातून, करोडो बलिदानातून,हजारो आंदोलनातून, शिस्तबद्ध विरोधातून,धर्मनिरपेक्षतेच्या गाजावाजाने,लोकशाहीच्या मिरवणुकीने संविधानाच्या मार्गावर दिमाखदार तोऱ्यात उभा झालेला देश जर कोणी विकण्याचा प्रयत्न करून देशात बहुजनांना गुलाम बनविण्याचे षडयंत्र राबवित असेल तर त्याची पळती वाट लावण्यासाठी बहुजन समाजाने एक होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन अॅड. वैशालीताई डोळस यांनी केले.
चंद्रपूर जिल्हयातून सागवान जर अयोध्येत जात असेल तर राम मंदिराच्या विश्वस्त मंडळामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील बहुजन समाजातील व्यक्ती का नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. चंद्रपूर जिल्ह्यातील सागवान जर राम मंदिराला चालत असेल तर बहुजन समाजातील व्यक्ती या व्यवस्थेला का चालत नाही हे विचारण्यासाठी एक व्हा. बहुजन एकतेची ताकद दाखवा आणि विषमतावादी आणि संविधान विरोधी व्यवस्थेला हद्दपार करण्याची मोठी जबाबदारी बहूजन समाजावर येऊन ठेपली आहे. प्रास्ताविकात सूर्यकांत खनके यांनी केले. ते म्हणाले की, भांडवलशाही सरकारच्या हातात देशात बेबंदशाही आणि जुलूमशाही सत्ता सुरु झालेली असून देश हुकूमशाहीकडे वाटचाल करतो आहे.
संविधानाचे समता बंधुता आणि न्यायाचे तत्व पायदळी तुडवली जात आहेत. लोकशाहीच्या मार्गाने छुप्पीगिरी करून भांडवलशाही वाढविण्याचे नाहक हेतुपुरस्सर प्रयत्न केले जात असल्यामुळे बहुजन समाजाने भविष्यातील धोक्याची घंटा लक्षात घेऊन एकत्र येऊन हुकूमशाही विरुद्ध संविधानिक लोकशाहीच्या लढ्याच्या संघर्षात एकतेची वर्जमुठ बांधण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली. आभार गोपाल अमृतकर यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.






