३६५ दिवस चालु राहणारी एकमेव पालडोह शाळा

477

बळीराम काळे,जिवती

जिवती (ता.प्र.) : चंद्रपूर जिल्ह्यातील शेवटच्या टोकावरील अतिदुर्गम आदिवासी बहुल जिवती तालुक्यातील पालडोह येथील जि.प.उच्च.प्रा.शाळा ही मागील ०९ वर्षांपासून सुट्टीविना सतत ३६५ दिवस सुरू आहे. त्या शाळेतील मुख्याध्यापक राजेंद्र परतेकी हे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची पिढी घडविण्यासाठी गुणवत्तापूर्ण नवनवीन शैक्षणिक प्रयोग मोठ्या परिश्रमाने दूरदृष्टी ठेऊन अचूक नियोजन करून राबवित आहेत. अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शाळेचे व शिक्षकांचे कौतुक केले आहे. ते शिक्षकदिनानिमित्त शिक्षकांशी संवाद या आयोजित कार्यक्रमातून दुरदृश्य या प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते.
खूप सारे स्वप्न उराशी बाळगून राजेंद्र परतेकी, शिक्षण सेवक २००६ मध्ये पालडोह च्या जि.प.शाळेत रुजू झाले तेंव्हा शाळेत फक्त २२ पटसंख्या होती. त्यांनी बदलीचे प्रयत्न न करता बदलाचे प्रयत्न करून शिक्षणाचे वेगवेगळे प्रयोग सुरू केले व आपल्या वागण्याने, अध्ययन शैलीने विद्यार्थ्यांचे व गावकऱ्यांचे मने जिंकून त्यांच्या संमतीने ३६५ दिवस शाळा सुरू ठेवण्याचा प्रयोग सुरू केला आणि आजतागायत तो अविरत सुरू आहे. विशेष म्हणजे त्यांनी मागील तीन वर्षापासून शालेय अभ्यासक्रम वेळआधीच पूर्ण केला. या सत्रातिल अभ्यासक्रमही या शाळेंनी ऑगष्टमध्येच पूर्ण केला आहे.
ओसाड वाटणाऱ्या शाळेचे लोकसहभागातून आज नंदनवन करून एखाद्या खाजगी शाळेला लाजवेल असे उदाहरण त्यांनी उभे केले आहे. मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण, कौशल्य आधारित शिक्षण, तंत्रज्ञान आत्मसात करून देशाची भावी पिढी घडवण्याचा मानस डोळ्यासमोर ठेवून राजेंद्र परतेकी सर यांनी मागील ०९ वर्षांपासून ३६५ दिवस शाळा अविरतपणे सुरू ठेवून राज्यात एक आदर्श उदाहरण निर्माण केले आहे.
वर्ग ४ पर्यंत असलेली शाळा वर्ग ८ पर्यंत झाली आणि वर्ग ९ व १० करिता प्रशासकीय पातळीवर त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. निवृत्ती होईपर्यंत दुर्गम भागातच काम करण्याची तसेच याच शाळेत संपूर्ण सेवा देण्याची मनापासून इच्छा आहे असे लोकमत प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी सबगीतले.
दुर्गम भागातील सुट्टीविना ३६५ दिवस चालणाऱ्या पालडोह येथील शाळेचे व राजेंद्र परतेकी यांचे राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडून झालेले कौतुक हे तालुक्यासाठी तसेच जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे.