पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात वृद्धाचा बळी, गडचिरोली तालुक्यातील 13 वा बळी

292

गडचिरोली : तालुक्यातील धुंडेशिवणी गावापासून दीड किमी अंतरावर सोमवारी पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात 65 वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नामदेव गुडी असे मृतकाचे नाव असून तो धुंडेशिवणी येथे राहत होता.

प्राप्त माहितीनुसार नामदेव दुपारी 12 वाजताच्या दरम्यान पोळ्याच्या बैलांची पूजा करण्यासाठी बेलपत्र तथा पत्रावळीसाठी कुड्याची पान आणायला आपल्या एका सहकाऱ्यासह गावापासून साधारणतः दीड किमी अंतरावरील वनविकास महामंडळाच्या अखत्यारीत असलेल्या पोर्ला वनपरिक्षेत्रातील चुरचूरा बीटमधील कक्ष क्र 1 मध्ये गेला होता. पान तोडत असतानाच साधारणतः 12.30 ते 1 वाजताच्या दरम्यान अचानक वाघाने त्याचेवर हल्ला केला. त्याचा सहकारी जवळच असल्याने तो या हल्ल्याने भयभीत होऊन जोराने ओरडला. त्यामुळे वाघ तिथून पळून गेला. त्याने लगेच घटनेचे वृत्त गावात दिले. वनविभागाशी संपर्क साधला गेला.

वनविकास महामंडळाचे सहाय्यक वनसंरक्षक अमोल नागे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील कारवाई केली. दरम्यान मृतकाच्या कुटुंबियांना अंतिम संस्काराकरीता 25 हजार रुपयांची सानुग्रह राशी वनविकास महामंडळाचे वतीने दिली आहे. सहायक वनसंरक्षकांनी सांगितले की घटनेच्या ठिकाणी दोन कॅमेरे लावण्यात आले असून सदर हल्ला करणारा वाघ हा वनविभागाकडून ओळख पटविण्यात आलेला तोच नरभक्षी वाघ आहे काय याचा शोध घेतला जाणार आहे.

ऐन पोळ्याच्या दिवशी शेतकरी आनदाने बैलांची पूजा करून सण साजरा करत असतांना गावात वाघाच्या हल्ल्यात गुडी यांचा मृत्यू झाल्यामुळे दुःखाचे वातावरण आहे.
नागरिक अजूनही निष्काळजी सध्या नरभक्षी आणि इतर वाघांचा पोर्ला वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वावर असून वनविभागाने या भागात भरपूर जनजागरण केले आहे.

नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचे, कामाव्यतिरीक्त अन्य लहानसहान कामासाठी जंगलात जाऊ नये, एकट्याने जंगल क्षेत्रालगत असलेल्या शेतांमध्ये मोठ्या गटाने जावे अशा सर्व प्रकारच्या सुचना दिल्यानंतरही ग्रामीण भागातील नागरिक निष्काळजीपणे वावरताना दिसून येत आहेत.

मागिल वर्षभरातील हा 13 वा बळी जरी असला तरी यातील एक बळी गावात झालेला नाही. लोक खाजगी कामासाठी जंगलात गेले तिथे त्यांचा मृत्यू ओढवला. वाघाच्या बंदोबस्तासाठी आंदोलन केल्या गेले. परंतू वाघाच्या क्षेत्रात जाऊ नका यासाठी हे आंदोलक गावागावात जनजागरणाचे काम करतील काय. वाघाचा बंदोबस्त केवळ वनविभागाकडून या एकाच बाजून होईल की त्याची दुसरी बाजू म्हणजे नागरिक ती ही लक्षात घ्यावी लागेल.