Homeचंद्रपूरगोंडपिंपरीग्रामपंचायत निवडणूकीच्या निमित्ताने...सुरज दहागावकर यांचा तरुणांना,मतदारांना आवाहन करणारा प्रबोधनात्मक लेख...

ग्रामपंचायत निवडणूकीच्या निमित्ताने…सुरज दहागावकर यांचा तरुणांना,मतदारांना आवाहन करणारा प्रबोधनात्मक लेख…

महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. कधी लोकांना नमस्कार न करणारे हातही निवडणूकीच्या निमित्ताने जोडल्या जात आहेत. निवडून येऊन फक्त घरदाराचाच विकास करणारेही गावाचा विकास करण्याचे आश्वासन देत आहेत. कधी भेटल्यावर, दिसल्यावर साधं तोंड न उघडू शकणारेही आज बोलू लागले आहेत. शेजारचा आजारी पडल्यावर दवाखान्यात जाण्यासाठी शंभर रुपयेही न देणारे आज पाचशे, हजार देण्यास तयार आहेत आणि विशेष म्हणजे ज्यांनी राजकीय सत्ता स्वतःची मालकी समजली, घराणेशाही निर्माण केली अश्या लोकांना घाम फोडायलाही गावातील तरुण सुद्धा उभे आहेत….

तरुण ज्याप्रमाणे या निवडणुकीच्या रणधुमाळीत उत्साह,जोश,हिंमत दाखवित आहेत ते खरंच प्रशंसनीय आहे. पण तरुण मित्रांना एक विनंती आहे की, निवडून कुणीही येऊ द्या, सत्ता कुणाच्याही हातात जाऊ द्या. हरलास किंवा अपेक्षित यश आले नाही तर नाराज होऊ नका. याच जोशाने,उत्साहाने गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एकजूट व्हा. कोणत्याही राजकीय पक्षाचा,नेत्याचा कार्यकर्ता बनण्यापेक्षा गावपरिवर्तनाच्या लढाईचे लढवय्ये योद्धे व्हा. या ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत फक्त दोन दिवस फिरून, उत्साह दाखवून शांत बसू नका किंवा आपल्याच कामात गुंतून न राहता समाजासाठी, गावासाठी थोडा वेळ द्या…

‘सत्ता असो की नसो’ गावाचा विकास होऊ शकतो. फक्त निवडून येणारी माणसं प्रामाणिक असायला हवी. त्यामुळे प्रामाणिक माणसं निवडून द्या. तरुणांनो स्वतः राजकारणात सक्रिय व्हा. गावातील घराणेशाही संपवून टाका. नाही तर होत काय? तर तोही निवडणुकीत उभा, त्याची बायकोही उभी, माय- बापानेही सत्ता कधी ना कधी उपभोगलेलीच. म्हणून नव्या चेहऱ्यांना,सुशिक्षित लोकांना निवडणूक द्या. कुणी पैसा कमविण्यासाठी उद्देशाने निवडणूकित उभे असेल तर त्याला बहुमताने घरचा रस्ता दाखवा. कारण अशी माणसं समाजाला घातक असतात.

मित्रांनो ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने एक गोष्ट लक्षात ठेवा. कोणताही व्यावसायिक व्यवसायात तेव्हाच पैसे गुंतवतो, ज्यावेळी त्याला त्या व्यवसायात अधिक नफा,फायदा दिसत असतो. कुणीही आपला व्यवसाय बुडावा, आपल्याला तोटा व्हावा म्हणून व्यवसायात उतरत नसतो. अगदी ग्रामपंचायत निवडणूक सुद्धा अशीच आहे. ज्याच्याकडे पैसा आहे अशी माणसं पैश्याच्या जोरावर निवडणूक लढतात. जास्तीत जास्त पैसा वाटण्यात, दारू पाजण्यात खर्च करतात आणि एकदा काय निवडून आले की, निवडणुकीत खर्च केलेला पैसा व्याजासहित ग्रामपंचायत मध्ये आलेल्या निधीतून वसूल करतात.

म्हणून माझ्या सर्व मतदारांना विनंती आहे की, ५००-१००० रुपये घेऊन, दारू पिऊन पाच वर्षासाठी तोंड बंद करून राहू नका, बोलते व्हा. ग्रामसभेत उपस्थित राहून प्रश्न विचारा, आपले प्रश्न मांडा. ग्रामपंचायत मध्ये आलेल्या निधींचा वापर योग्य होतो की नाही यांवर लक्ष ठेवा. गावातील समस्या शासन दरबारी मांडून त्यावर उपाययोजना करा आणि महत्वाचं म्हणजे दोन दिवसांच्या राजकारणासाठी आयुष्यभराचे संबंध तोडू नका….
जय संविधान !
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
-सुरज दहागावकर
-सकमुर(चेकबापूर) तह-गोंडपिपरी जि. चंद्रपुर
-मो.न.8698615848

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!