अटलजींची कविता केवळ वाचायची नसून जगायची असते – आ. सुधीर मुनगंटीवार

295

शेखर बोनगिरवार

श्रध्‍देय अटलजींनी त्‍यांचे अवघे आयुष्‍य देशसेवेसाठी समर्पित केले. ते प्रखर राष्‍ट्रभक्‍त होते, अमोघ वाणीचे धनी होते, संघटन कुशल नेते होते, पत्रकार, कवी होते, सहृदय मित्र होते. या बहुआयामी व्‍यक्‍तीमत्‍वाने दीर्घकाळ भारतीयांच्‍या मनाला मोहीनी घातली होती. जेव्‍हा अटलजींच्‍या नेतृत्‍वातील 13 दिवसांचे सरकार विश्‍वासघाताने पाडले गेले तेव्‍हा अवघा देश हळहळला, अनेकांच्‍या डोळयांच्‍या कडा पाणावल्‍या. त्‍यांच्‍या कविता मौलीक संदेश देणा-या होत्‍या. ‘कदम मिलाकर चलना होगा’ असा संदेश त्‍यांनी त्‍यांच्‍या एका कवितेतुन दिला आहे. त्‍यांच्‍या अशा अनेक कविता आहेत. त्‍यांची कविता केवळ वाचायची नसून जगायची असते असे भावपूर्ण प्रतिपादन माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

दिनांक 25 डिसेंबर रोजी माजी पंतप्रधान भारतरत्‍न अटलबिहारी वाजपेयी यांच्‍या जयंतीदिनानिमीत्‍त त्‍यांच्‍या स्‍मृतींना उजाळा देण्‍यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर महानगर शाखेतर्फे स्‍थानिक लोकमान्‍य टिळक कन्‍या विद्यालयात एका सभेचे आयोजन करण्‍यात आले होते. या सभेत आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते प्रमोद कडू, भाजपा महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, सरचिटणीस राजेंद्र गांधी, महापौर सौ. राखी कंचर्लावार, भाजयुमो महानगर जिल्‍हाध्‍यक्ष विशाल निंबाळकर, ब्रिजभूषण पाझारे, सुभाष कासनगोट्टूवार, रविंद्र गुरनुले, तुषार सोम आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, ज्‍या काळी भारतीय जनता पार्टी सत्‍तेपासून कोसो दूर होती तेव्‍हा लोक विचारायचे की तुम्‍ही सत्‍तेत नाही तरीही निष्‍ठेने काम कसे करता ? प्रश्‍नाचे उत्‍तर एकच होते की अटलजी म्‍हणायचे सत्‍ता हे साध्‍य नसून सेवेचे साधन आहे. सत्‍ता सर्वश्रेष्‍ठ नसून जनसेवेचे अंतिम लक्ष्‍य आहे. अटलजींची ही वाक्‍ये मनात जपून असंख्‍य भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्‍यांनी आजवरच प्रवास साधला आहे. अटलजींचे नांव, काम मोठे होते. कार्यकर्त्‍यांना मोठे करण्‍याची शक्‍ती त्‍यांच्‍यात होती. देशातील नागरिकांना आपला परिवार मानणारे ते नेते होते. कॉंग्रेस नेत्‍यांनी परिवारासाठी देश सोडला आणि अटलजींनी देशासाठी परिवार सोडला. त्‍यांची कृती सात्विक, तात्विक, प्रामाणिक तसेच जनसेवेसाठी बांधीकली राखणारी होती, असेही आ. मुनगंटीवार यावेळी बोलताना म्‍हणाले. विजय झाला तर माजायचे नाही आणि पराभव झाला तर लाजायचे नाही असा संकल्‍प आजच्‍या दिवशी आपण करू या असेही ते म्‍हणाले.

आ. मुनगंटीवार यांनी त्‍यांच्‍या लोकसभा निवडणूकीत प्रचारासाठी अटलजी आले असतानाच्‍या आठवणीला उजाळा दिला. जेव्‍हा लोकसभा निवडणूकीच्‍या प्रचारासाठी अटलजी आले होते तेव्‍हा त्‍या उत्‍तुंग व्‍यक्‍तीमत्‍वाच्‍या शेजारी उमेदवार म्‍हणून बसण्‍याचा योग आला. माझे भाषण ठेवू नका अशी विनंती मी तेव्‍हा केली होती. मात्र उमेदवाराचे भाषण झालेच पाहीजे असा आग्रह अटलजींनी केला. मनात धास्‍ती होती. पण माझे भाषण झाल्‍यानंतर अटलजींसारख्‍या ज्‍येष्‍ठाने ये नौजवान आगे बढेगा, बडा नेता बनेगा, असे उदगार काढले. त्‍यांचे ते आशीर्वचन माझ्या राजकीय प्रवासातील संचीत ठरले. जेव्‍हा 2010 मध्‍ये प्रदेशाध्‍यक्ष झाल्‍यानंतर मुंबईच्‍या प्रदेश कार्यालयात गेल्‍यावर अटलजींची प्रकर्षाने आठवण झाली. त्‍यानंतर अटलजींचा आशिर्वाद घेण्‍यासाठी मी नवी दिल्‍लीत गेलो असता ज्‍या नेत्‍याच्‍या वाणीवर सरस्‍वती नांदायची त्‍या नेत्‍याला अबोल झालेले बघताना मनाला वेदना झाल्‍या. माझ्या मनात ज्‍यांची प्रतिमा नायकाची होती तो नायक निःशब्‍द होता, असे सांगताना आ. मुनगंटीवार भावूक झाले होते.

*अटल डिजीटल अॅप*

आज अटलजींच्‍या जन्‍मदिनाचे औचित्‍य साधुन ‘अटल डिजीटल अॅप’ ची सुरूवात आपण केली आहे. हा प्रयोग महाराष्‍ट्रातील पहीला प्रयोग असला तरीही हा देशातील पहिला प्रयोग ठरावा असा माझा मानस आहे. 25 जानेवारी ला मतदार जागृती दिवस आहे. त्‍या‍ दिवशी हया अॅपचे उदघाटन आपण करणार असल्‍याची माहिती आ. मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.
यावेळी भाजपा नेते प्रमोद कडू यांनीही अटलजींच्‍या आठवणींना उजाळा देत ओघवते भाषण केले. डॉ. मंगेश गुलवाडे, विशाल निंबाळकर यांचीही यावेळी भाषणे झालीत. कार्यक्रमाचे संचालन मयुर चहारे यांनी केले. कार्यक्रमाला भाजयुमोचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक, नगरसेविका आदींची उपस्थिती होती.