नितेश खडसे गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
सरपणासाठी जंगलात गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून तिला ठार केल्याची घटना गडचिरोली लगतच्या गोगाव जंगल परिसरात आज शुक्रवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली. मंजुळा चौधरी (62) रा. गोगाव असे मृतक महिलेचे नाव आहे. आठवडाभरात ही दुसरी घटना असून या घटनेने नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. चार दिवसांपूर्वीच गडचिरोली शहरालगतच्या चांदाळा मार्गावर जंगलात सरपणासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले होते.
गडचिरोली शहरालगत चामोर्शी, धानोरा, आरमोरी मार्गावर मोठे जंगल आहे. या जंगल परिसरात गेल्या काही दिवसांपासून अनेक नागरिकांना वाघाचे व बिबट्याचे दर्शन होत आहे. त्यामुळे वन विभागाने चारही मार्गावर फलक लावून सावधानतेचा इशारा दिला आहे. तरीही काही महिला सरपण गोळा करण्यासाठी जंगलात जातात. त्यामुळेच गेल्या आठवडाभरात दोन घटना घडल्या आहेत. सदर वनक्षेत्र वडसा वानविभागात येत असल्यामुळे वनाधिकारी व वनकर्मचारी पुढील तपास करत आहेत.