डॉ.शीतल आमटे यांच्या सासू-सासऱ्याने उपस्थित केलेल्या प्रश्नांवर भावजय पल्लवी आमटे यांची प्रतिक्रिया…

699

डॉ. बाबा आमटे यांच्या समाजसेवेचा वारसा पुढे नेणाऱ्या प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या, महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी 30 नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली. डॉ. शीतल आमटे-करजगी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या सासुु-सासरच्यांनी एक पत्रक जारी करून आमटे कुटुंबीयांवर आरोप केले होते. त्याच्या उत्तरादाखल डॉ. शीतल आमटे यांच्या वहिनी पल्लवी आमटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पल्लवी आमटे या शीतल यांचे बंधू कौस्तुभ आमटे यांच्या पत्नी आहेत. त्यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, जे घडले ते फार दुर्दैवी आहे. आमटे कुटुंबीयांना यातून सावरायला वेळ लागेल. शीतल अतिशय बुद्धिमान व गुणवान होती. तिने जे काही स्वप्न पाहिले. तिची पुढील दिशा जी काही होती. ते पूर्ण करण्यासाठी आमटे कुटुंबीय कटिबद्ध आहेत, असं पल्लवी आमटे म्हणाल्या आहेत.

डॉ. शीतलच्या मृत्युची चौकशी सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतर सत्य पुढे येईलच. शीतलच्या मृत्युने आमटे परिवाराचे खूप मोठे नुकसान झाले आहे. यातून सावरायला वेळ लागेल. आजवर समाजाने आनंदवनला जे सहकार्य केले. तसेच सहकार्य यापुढेही होईल, अशी अपेक्षाही पल्लवी यांनी व्यक्त केली आहे.

शीतल यांच्या मृत्युनंतर त्यांच्या सासू-सासऱ्यांनी आमटे कुटुंबीयांवर आरोप केले होते, त्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर पल्लवी म्हणाल्या की, आमटे व करजगी परिवार दु:खात आहे. दुःखात अशा गोष्टी बोलल्या जाऊ शकतात. करजगी परिवाराने आपल्या पद्धतीने आपले दु:ख व्यक्त केले आहे. त्यामुळे आत्ता यावर काही बोलून उपयोग नाही, असं स्पष्टीकरण पल्लवी यांनी दिलं आहे.

शीतल या महारोगी सेवा समितीच्या सीईओ होत्या. त्यामुळे आता त्यांच्या पश्चात हा वारसा कुणाकडे जाईल, या प्रश्नावर पल्लवी म्हणाल्या की, आनंदवनबाबत निर्णय करण्याची ही वेळ नाही. विचारांची दिशा योग्य पद्धतीने जाण्यासाठी आणि यातून सावरण्यासाठी काही वेळ लागणार आहे. काळ पुढे गेल्यानंतर एकेका प्रश्नाचं उत्तर मिळेल, असं त्या म्हणाल्या आहेत.