महाशया दी हट्टी म्हणजेच एमडीएच. भारतीय मसाल्यांचा सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध ब्रँड. याचे चेअरमन आणि एमडीएच मसाल्याच्या जाहिरातीचा लोकप्रिय चेहरा महाशय धर्मपाल गुलाटी यांचे आज निधन झालं आहे. पहाटे 5.38 वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांचं निधन झालं आहे.
काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनातून बरे झाल्यानंतर महाशय धर्मपाल यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांची प्रकृती खालवली आणि आज गुरुवारी पहाटे दिल्लीच्या माता चंदन देवी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
केवळ पाचवी पर्यंत शिक्षण झालेल्या महाशय धर्मपाल गुलाटी यांनी बड्या उद्योगपतींना मागे टाकत 2017 मध्ये देशातील सर्वात श्रीमंत सीईओ होण्याचा मान पटकावला होता. ‘एमडीएच’ची वार्षिक उलाढाल 1500 कोटींच्याही वर आहे.
त्यांच्या कंपनीकडे 15 कारखाने असून 1000 डिलर्सचं जाळं आहे. महाशय धर्मपाल गुलाटींना त्यांच्या मसाले उद्योग क्षेत्रातील यशासाठी त्यांना 2019 मध्ये ‘पद्म भूषण’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार धर्मपाल गुलाटी यांना प्रदान करण्यात आला होता.