जिल्हयात 3.84 लक्ष नागरिकांची माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत तपासणी

0
166

जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी आशाताईंचा निर्धार

गडचिरोली प्रतिनिधी/सतिश कुसराम

*गडचिरोली दि. 30 (जिमाका वृत्तसेवा)* : जिल्हयात सर्व तालुक्यात मिळून 3,84,977 नागरिकांची तपासणी गावस्तरावरील कोरोनादूतांनी केली आहे. जिल्हयातील कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी व त्यामूळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी आशा, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक तसेच स्थानिक स्वयंसेवक गावोगावी घरोघरी नागरिकांची तपासणी माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत करत आहेत. आशा आणि त्यांच्या टीमने गडचिरोली जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठीच निर्धार केला आहे असे जिल्ह्यात चित्र निर्माण झाले आहे. गावागावात आशाताई आणि त्यांची टीम कोरोना बाबत तपासण्या करित आहेत. या सर्व कोरोनादूतांना नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम एक चळवळ म्हणून पुढे येत असल्याचे प्रतिपादन नुकतेच जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले होते. यातून प्रत्येक गावात, गावातील लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते सहभागी होत आहेत. नागरिकांनीही या मोहिमेबाबत गैरसमज करून घेवू नयेत असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.

*थँक यू “आशाताई” मधून आशाचे आभार*
जिल्हा प्रशासन गडचिरोली द्वारे नाविण्यपुर्ण थँक यू “आशाताई” ही मोहिम राबविली जात आहे. जिल्हयातील आशा वर्कर तसेच अंगणवाडी सेविका घरोघरी जावून आरोग्य शिक्षण देत आहेत. याकरिता त्यांचे आभार मानन्यासाठी व त्यांच्या कामाचे महत्व लोकांना पटावे म्हणून जिल्हाधिकारी दीपक सिंगला व मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद यांनी थॅन्क यू “आशाताई” मोहिम जिल्हयात राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांचे काम सर्व स्तरावर पोहचविणे हे या मोहिमेचे उद्दीष्ट आहे. दोन दिवसांपुर्वी राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे यांनी या मोहिमेबद्दल ऑनलाईन बैठकित प्रशांसा केली होती. थॅन्क यू “आशाताई” यामध्ये आशा व इतर गावस्तरावरील कोरोना दूतांचे व्हिडीओ तयार करून प्रसिद्ध केले जाणार आहेत.

*तालुकानिहाय तपासणी करण्यात आलेल्या घरांची व कुटुंबातील सदस्यांची माहिती*
अहेरी – 5441 (21060), आरमोरी -11057 (39158), भामरागड -3368 (11954), चामोर्शी – 17203 (54077), धानोरा – 12105 (46077), एटापल्ली – 3651 (17022), गडचिरोली – 6613 (38857), कोरची- 6452 (25728), कुरखेडा -11075 (41663), मुलचेरा – 4473 (19346), सिरोंचा – 6293 (20803) व वडसा – 5486 (44529).
एकुण – 69880 घरांमध्ये 384977 नागरिकांची तपासणी पुर्ण

*सर्वेक्षणातून समोर आलेल्या बाबी*
जिल्हयातील 69880 घरांमध्ये 384977 नागरिकांची तपासणी पुर्ण केल्यानंतर 621 सारी व आयएलआयचे रूग्ण मिळाले. ऑक्सीजनचे प्रमाण 95 पेक्षा कमी असणारे 1272 जण आढळून आले आहेत. या सर्व मधील 680 लोकांना आशाद्वारे संदर्भित करण्यात आले आहे. संदर्भित केलेल्यांपैकी 40 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली त्यापैकी 4 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. उर्वरित संदर्भित केलेल्या नागरिकांनाही घरीच विलगीकरणात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

*कलापथकांद्वारे दुर्गम भागातील गावागावात माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेबाबत जनजागृती*
ग्रामीण भागातील गावागावात ग्रामस्थांना आरोग्य विषयक जनजागृती, कोरोना आजारा बाबत माहिती देणे, कोरोना संसर्गाबाबत राबवित असलेल्या उपाय योजनांची माहिती देणे तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारीचे महत्व पटवून देणे यासाठी कलापथकांचे कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत. जिल्हा स्तरावरून जिल्हा आरोग्य विभाग गडचिरोली मार्फत सदर कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानातून आरोग्य विषयक जनजागृती करण्यासाठी 6 कलापथकांची निवड करण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्हयात 10 तालुक्यात 38 ठिकाणी कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे.

या मोहिमेंतर्गत प्रशासनाने नियुक्त केलेल्या पथकाद्वारे घरातील सदस्यांचे तापमान, ऑक्सिजन आणि को-मॉर्बिड रुग्ण आहेत का याची माहिती घेतली जात आहे. तसेच ताप, खोकला, दम लागणे, ऑक्सिजन कमी भरणे अशी कोविड सदृश लक्षणे असणाऱ्या नागरिकांना जवळच्या फिव्हर क्लिनिकमध्ये संदर्भित करण्यात येऊन तेथे कोविड-19 च्या तपासणीसाठी चाचणी करुन पुढील उपचार केले जातात. प्रत्येक घरात फक्त 5 मिनीटात तपासणी पुर्ण होते. नागरिकांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सतत मास्क वापरणे आवयक आहे. तसेच हात साबण किंवा सॅनिटायझरने वारंवार स्वच्छ धुवावेत. नाक, तोंड, डोळे यांना वारंवार हात लावू नये. कोरोना सदृश लक्षणे आढळल्यास त्वरीत जवळच्या रुग्णालयात जावून तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here