Home Breaking News “आमची जमीन, आमचा अधिकार..! एमआयडीसीला ठाम नकार..!!” गोंडपिपरीत आज भव्य शेतकरी परिषद...

“आमची जमीन, आमचा अधिकार..! एमआयडीसीला ठाम नकार..!!” गोंडपिपरीत आज भव्य शेतकरी परिषद व महामोर्चा;…

86

“आमची जमीन, आमचा अधिकार..! एमआयडीसीला ठाम नकार..!!”

गोंडपिपरीत आज भव्य शेतकरी परिषद व महामोर्चा;

करंजी एमआयडीसी रद्द करण्यासाठी १२ गावांचा एल्गार

प्रतिनिधी शरद कुकुडकर

गोंडपिपरी : “आमची जमीन, आमचा अधिकार..! एमआयडीसीला ठाम नकार..!!” अशा जोरदार घोषणांसह गोंडपिपरी तालुक्यातील १२ गावांतील शेतकरी आज प्रस्तावित करंजी एमआयडीसी प्रकल्पाविरोधात एल्गार पुकारणार आहेत. शेतजमिनीवर लादल्या जाणाऱ्या प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्पाच्या निषेधार्थ गुरुवार, २८ मे रोजी गोंडपिपरी येथे दुसरी भव्य शेतकरी परिषद व शेतकरी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
“गाव वाचवायचे असेल, शेती वाचवायची असेल तर एकजूट व्हा..!” असा संदेश देत शेतकरी एकता संघर्ष कृती समितीच्या वतीने या आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या परिषदेला तब्बल तीन हजार महिला, शेतकरी, युवक व युवती उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
सकाळी ११ वाजता माता कन्यका सभागृह येथे पत्र परिषद आयोजित करण्यात आली असून त्यानंतर शेतकरी परिषदेत विविध मान्यवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी ३ वाजता उपविभागीय कार्यालयावर भव्य शेतकरी महामोर्चा काढण्यात येणार आहे.
या परिषदेला माजी मंत्री तथा माजी विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीसह माजी आमदार ॲड. वामनराव चटप, माजी आमदार सुभाष धोटे, लोककलावंत तथा अभिनेते अनिरुद्ध वनकर, आदिवासी नेते गजानन जुमनाके, नागपूर हायकोर्टचे ॲड. बोधी रामटेके, ॲड. दीपक चटप, प्रकाश तावाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
करंजी एमआयडीसी प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी १२ गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने एकवटणार असून हा महामोर्चा सरकारचे लक्ष वेधून घेणारा ठरणार असल्याचा विश्वास शेतकरी एकता संघर्ष कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Don`t copy text!