नैनवाडी वनक्षेत्रात मोठी कारवाई : अवैध सागवानासह ९.५ लाखांचा मुद्देमाल जप्त

एटापल्ली प्रतिनिधी आदित्य चिप्पावार:
भामरागड वनविभागाअंतर्गत येणाऱ्या एटापल्ली वनपरिक्षेत्रातील नैनवाडी परिसरात वन विभागाने अवैध सागवान तस्करीवर मोठी कारवाई करत सुमारे ९ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरातील तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगड सीमेलगत असलेल्या या भागात अवैध सागवान वाहतुकीच्या तक्रारी सातत्याने प्राप्त होत होत्या. त्यानुसार वन विभागाने सापळा रचून तपासणी मोहीम राबवली. दरम्यान, CG-05-D-1307 क्रमांकाच्या पिकअप वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये अवैधरित्या सागवान चिरान लाकूड वाहतूक करत असल्याचे आढळून आले.
वन विभागाने तत्काळ वाहनासह सागवान जप्त केला. जप्त मुद्देमालामध्ये वाहनासह लाकडाची एकूण किंमत सुमारे ९.५ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
या प्रकरणी वाहन चालकासह संबंधितांवर वन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी व त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. वन संपत्तीचे रक्षण करण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे.







