घोट–रेगडी मार्गाच्या रुंदीकरणाकडे शासनाचे दुर्लक्ष; नागरिकांची तीव्र मागणी

प्रतिनिधी गौरव बुरांडे
घोट-रेगडी मार्गाच्या रुंदीकरणासाठी व त्याचे राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषणा करण्याची तीव्र मागणी नागरिकांकडून होत आहे. या मार्गामुळे दोन्ही राज्यांतील संपर्क सुधारेल.
सध्या कसनसूर–रेगडी–घोट मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून रस्ता केवळ तात्पुरत्या डागडुजीवर सुरू आहे. विशेषतः रेगडी ते कसनसूर दरम्यान अनेक ठिकाणी रस्ता पूर्णपणे उखडला असून मुरूम टाकून तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली आहे. रस्ता अत्यंत अरुंद असल्याने वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी या मार्गावरून प्रवास करणे अधिक धोकादायक ठरत असून अपघातांची शक्यता वाढली आहे.
घोट रेगडी या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे, तीव्र वळणे आणि अरुंद पट्टा असल्याने वाहनचालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. कसनसूर परिसरातील शेकडो गावांचा चामोर्शी तसेच चंद्रपूर, गडचिरोली जिल्हा मुख्यालयाशी संपर्क या मार्गावर अवलंबून आहे. त्यामुळे हा मार्ग नागरिकांच्या दैनंदिन जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. या पार्श्वभूमीवर, घोट–रेगडी–कसनसूर मार्गाचे तात्काळ रुंदीकरण करून त्यास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा द्यावा व छत्तीसगड राज्याशी थेट जोडणी करावी, अशी ठाम मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. शासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
छत्तीसगड–महाराष्ट्र सीमेवरील भागात मोठ्या प्रमाणात बंगाली भाषिक नागरिक वास्तव्यास आहेत. या नागरिकांमध्ये सतत परस्पर संपर्क राहून सामाजिक, सांस्कृतिक आणि कौटुंबिक संबंध दृढ झाले आहेत. “रोटी-बेटी”चे नाते निर्माण झाल्यामुळे दोन्ही राज्यांतील लोकांमध्ये आपुलकीचे बंध अधिक घट्ट झाले आहेत. परिणामी, या सीमावर्ती भागात नातेवाईकांची ये-जा तसेच व्यापार-व्यवहार सातत्याने सुरू असतो.







