कर्मकांडाला नकार देत भोयर कुटुंबियांची प्रबोधनात्मक श्रद्धांजली.
प्रतिनिधी विशाल शेंडे

राजुरा: तालुक्यातील चार्ली येथील प्रतिष्ठित नागरिक व सेवा सहकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष मारोती झित्राजी भोयर (वय ९४) यांचे ७ एप्रिल २०२६ रोजी आजारपणाने निधन झाले. त्यांनी आपल्या आयुष्यात कौटुंबिक, सामाजिक, कृषी, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले होते.
त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भोयर कुटुंबियांनी पारंपरिक अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे कर्मकांड न करता २२ एप्रिल रोजी प्रबोधन कार्यक्रम आयोजित करून आगळ्यावेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली अर्पण केली. या कार्यक्रमातून समाजात वैज्ञानिक व तार्किक विचारांचा प्रसार व्हावा, अंधश्रद्धा दूर व्हावी आणि शिक्षणाचे महत्त्व वाढावे हा संदेश देण्यात आला. उपस्थित पाहुण्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविणारी पुस्तके भेट देण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमाकांत धांडे होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून शंकरराव लोनगाडगे यांनी मार्गदर्शन केले. गुरुदेव सेवा मंडळ राजुराचे पदाधिकारी मोहनदास मेश्राम, मारोती सातपुते, मराठा सेवा संघ राजुराचे पदाधिकारी संभाजी साळवे, दिनेश पारखी यांची विशेष उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून चार्ली गावचे सरपंच विजय निवलकर, गुरुदेव सेवा मंडळ चार्लीचे अध्यक्ष श्रीनिवास महाकुलकर, प्रभाकर मोरे, विनोद देवाळकर, कवडुजी पाहाणपटे, शंकर भोयर, प्रभाकर झाडे, मोरेश्वर हिंगाने, लताताई झाडे, मंगला तिखट आदी मान्यवर उपस्थित होते.प्रमुख मार्गदर्शक शंकरराव लोनगाडगे यांनी आपल्या मनोगतातून समाजाने अंधश्रद्धा सोडून विवेकवादी विचार स्वीकारावेत, कर्मकांडावर खर्च होणारा पैसा मुलांच्या शिक्षणावर करावा तसेच व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी अशा प्रबोधन कार्यक्रमांची गरज असल्याचे सांगितले. अध्यक्ष उमाकांत धांडे यांनी स्मृतिशेष मारोती भोयर यांच्या सर्व क्षेत्रातील कार्याचा गौरव करून अशा उपक्रमातून समाजप्रबोधनाला चालना मिळते, असे मत व्यक्त केले. तसेच मोहनदास मेश्राम, मारोती सातपुते, संभाजी साळवे, दिनेश पारखी व इतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन राजू भोयर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नातेवाईक, हितचिंतक व गावकऱ्यांनी सहकार्य केले.पारंपरिक रूढींना छेद देत प्रबोधनात्मक श्रद्धांजली अर्पण करण्याच्या या उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत असून भोयर कुटुंबियांच्या धाडसी व आदर्श निर्णयाचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे.







