मुंबईत भारतीय जनता पार्टी कोअर कमिटी बैठक : जिप- पंस निवडणुकांसाठी रणनीतीवर चर्चा, आदिवासी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांची उपस्थिती
इंडिया दस्तक न्यूज नेटवर्क
मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक मुंबई येथे पार पडली. या बैठकीस आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीमध्ये पक्ष संघटन अधिक सक्षम करण्याबाबत तसेच येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये पक्षाचे जास्तीत जास्त सदस्य निवडून आणण्यासाठी सविस्तर रूपरेखा ठरविण्यात आली. ग्रामीण भागात पक्षाची पकड अधिक मजबूत करण्यासाठी विविध कार्यक्रम, बूथ स्तरावरील बांधणी आणि कार्यकर्त्यांच्या समन्वयावर भर देण्याचे ठरले.
या कोअर कमिटी बैठकीस आदिवासी समाजातील माजी खासदार डॉ. भारती पवार, प्रदेश चिटणीस संतोष जन्नाटे, विधानपरिषद सदस्य परिणय फुके तसेच रामदास तडस आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी संघटन बळकटीसाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी डॉ. देवराव होळी यांनी आपले विचार मांडताना आदिवासी समाजातील प्रश्न, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाचे प्रतिनिधित्व वाढविण्याची गरज आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना सक्षम करण्याबाबत मार्गदर्शन केले. येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी सज्ज राहून पक्षाची ध्येये पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
बैठकीत आगामी निवडणुकांच्या रणनीतीवर सखोल चर्चा करण्यात आली असून पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी ठोस पावले उचलण्याचा निर्णय घेण्यात आला.







