Home Breaking News परंपरेपासून डिजिटल युगापर्यंत : मराठीच्या अभिजात वैभवाचा अभ्यासपूर्ण आढावा…लेखक – जिवनदास काकडे...

परंपरेपासून डिजिटल युगापर्यंत : मराठीच्या अभिजात वैभवाचा अभ्यासपूर्ण आढावा…लेखक – जिवनदास काकडे | चंद्रपूर

103

परंपरेपासून डिजिटल युगापर्यंत : मराठीच्या अभिजात वैभवाचा अभ्यासपूर्ण आढावा…

अभिजात मायबोली, प्राचीन लोकपरंपरा, पाश्चात्यप्रभाव आणि आपले आधुनिक पांडीत्य
भाषा गौरव दिन व साहित्य संमेलानानिमित्य अ.मराठी भाषा व लोकपरंपरेला नवचेतना

लेखक – जिवनदास काकडे | चंद्रपूर

(साहित्य अभ्यासक)

सामाजिक समता, स्वातंत्र्य आणि मानवी मूल्यांवर आधारित त्यांच्या लेखनाने अनंत काळासाठी मराठी साहित्यावर प्रभाव टाकनारे साहित्यिक, महान कवी, नाटककार, कादंबरीकार, निबंधकार आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, आदरणिय पद्मभुषण वि. वा. शिरवाळकर म्हणजेच कुसुमाग्रजांचचा जन्मदिन. हा दिवस त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा केला जातो. “वृद्धत्व म्हणजे दुसरं बालपण म्हणतात, पण त्या बालपणाला आई नसते.” असा भावनिक ओलावा लेखनात निर्माण करणारे कुसूमाग्रज, यांबद्दल, “कुसुमाग्रजांची भाषा ही केवळ काव्याची नाही; ती जीवनाची भाषा आहे.”, असे म्हणत वि. स. खांडेकर त्यांचे वर्णन करतात. मराठी भाषावरून आठवणीत येते ते नुकताच गतमहिन्यात पार पडलेले स्वराज्यविस्तारक छत्रपती थोरले शाहू महाराज साहित्यनगरी सातारा येथे आयोजित करण्यात आलेले एक कमी शंभरावे अखिल भारतीय अभिजात भाषा मराठी साहीत्य संमेलन. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला असतांना हे दूसरेच साहित्य संमेलन होते. तसेच २१ फेब्रुवारी ला UNESCO द्वारे “जागतीक आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन” अख्या जगात आणि अर्थातच महाराष्ट्रामध्ये साजरा करण्यात आला. २०२६ सालासाठी “बहुभाषिक शिक्षणावर तरुणांचे मत” ही संकल्पना प्रस्तूत करण्यात आली. तसेच येणाऱ्या २७ मार्च ला अख्या विश्वात “जागतीक रंगभुमि दिन” साजरा करण्यात येईल. ह्या सर्व चौसुत्री अवचित्यांना साधुन माझे मनोगत लेखाद्वारे प्रस्तूत करण्याची मला आतुरता वाटते.

थोर जेष्ट समाजअभ्यासीका, मानववंशशास्त्रज्ञ, साहित्यिका व लोकसंस्कृती आणि लोकपरंपरेच्या गाढ्या अभ्यासिका, प्रा. डॉ. तारा भवाळकर म्हणतात,”भाषा, लोकपरंपरा, आणि मनुष्य ह्या जिवंत संस्था आहेत. भाषा ही जैवीक आहे. लोकपरंपरा आणि मनुष्य पृथक नाही, ती कोणत्याही परिस्थितीत मनुष्याला भाषेद्वारे टिकवून ठेवते. तीच्या स्वरूपात नेमका बदल होऊ शकतो, पण तीचे अस्तीत्व कायमचे ठरते. भाषा ही कुठल्याही संस्कृती चे बलस्थान आहे.” अशी ही मराठी भाषा सर्व घटकांवर वापरली जात असून तीची महती विस्तारणारे, “पुस्पामाजी पुस्प मोगरी, की परिमळांमाजी कस्तुरी, तैसी भासामांजी, साजिरी भासा मराठी” अश्या शैलीत व्यक्त होणारे पोर्तुगाली फादर स्टीफन्स पासणं, “वस्त्र लेवुन विरळ हवेचे नृत्य करितसे लल्ला मोदे.” म्हणणाऱ्या उत्तरेच्या लल्लेश्वरी ते दक्षिणेकडचच्या अक्कामहादेवी आपल्याला आढळून येतात.

लोकपरंपरेतून भाषेचा विकास व जळणघळण –

महाराष्ट्राला लाभलेला निसर्ग, भौगोलीक स्थिती, ऐतीहासीक वारसा व अनेक सांप्रदाय यांमुळे मराठी भाषेचा विविधपणे विस्तार तसेच विकास देखिल झाला. महाराष्ट्रामध्ये उत्तरेची आर्यसंस्कृती आणि दक्षिणेची द्रविडसंस्कृती अश्या दोनही संस्कृतींचा मिलाप आहे त्यामुळे येथे संस्कृतींची देवाण-घेवाण, उदारमनस्कता ही चालत आलेली आहे. तसेच अलिकडे बघायला मिळते की आदिमकाळापापून ते लोकपरंपरेतल्या व्यक्तींनी, खास करून महिलांनी ही भाषा समृद्ध केलेली आहे. उदाहरणास्तव, जात्यावरच्या ओव्या असतील, शेणसारवतांना गाईलेल्या ओव्या, गौरी गणपतीची गाणी, हळदीची- लग्नाची गाणी, अंगाई, पाळणे, गौळणी, शेतातील पीक काळतांनाची गाणी (श्रमगीत), उखाणे व इतर सनावारांमध्ये गायले जाणारी गाणी, व यांतून महिलांनी मांडलेले अनेकानेक भाव ह्या सर्वांनी लोकपरंपरेतून मराठी भाषा प्रगतशील रीत्या संरक्षित झाली आहे. उदाहरणास्तव, “जनी म्हणे जाते जाईन, कीर्ती गं राहीन. प्रकट बोलू नये जनात, तु ये रे बा विठ्ठला.”

त्याचप्रमाणे, विविध पंथ व संप्रदायांनी मराठी भाषा ठिकवली, संरक्षली आणि प्रसारली. त्यांत अनेक पंथंसंप्रदायांचे विषिष्ठ योगदान हे महत्त्वपूर्ण आहे. महाराष्ट्रातील धार्मिक, सांस्कृतिक व भाषिक जडणघडणीत वारकरी, महानुभाव, नाथ, समर्थ, दत्त, शाक्त आणि शैव हे प्रमुख पंथ/संप्रदाय आहेत. त्यांपैकी, महानुभव पंथाचे विशेष उल्लेख करणे गरजेचे ठरते. १२ व्या-१३ व्या शतकात चक्रधर स्वामींनी स्थापन केलेला महानुभाव पंथ मराठी भाषेचा आद्य संरक्षक मानला जातो. तत्त्वज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी संस्कृतऐवजी मराठीचा (लोकभाषा) ‘धर्मभाषा’ म्हणून वापर केल्यामुळे मराठीला संरक्षण व प्रतिष्ठा प्राप्त झाली. महानुभाव पंथाने आपल्या आचार-विचारातून मराठी भाषेला ‘ज्ञानभाषा’ बनवण्याचे मोठे काम केले. महानुभव पंथाचे वाङ्मय हे मराठी साहित्यातील गद्य व पद्य अशा दोन्ही रूपांतील आद्य मराठी साहित्य मानले जाते. त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाला विसरून चालणार नाही. मराठी भाषेनी वारकरी संप्रदायाच्यावेळी “सोनियाचा दिनू” बघीतला आहे. ह्याच काळात मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी पायाभरणी झालेली दिसून येते. संतवाङ्मयामध्ये बघीतलं तर ठळकपणे,”माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके।” असे व्यक्त होणारे संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज ते “संस्कृत वाणी देवें केली। तरी प्राकृत काय चोरापासोनी आली” असे प्राकृत भाषेला दर्जा प्रधान करताना व्यक्त होणारे संत एकनाथ महाराज. “आह्मां घरीं धन शब्दाचींच रत्ने । शब्दाचींच शस्त्रे यत्ने करूं”, असे मराठीतून म्हणारे जगतगुरू संत तुकाराम महाराज.

तीतकेच म्हत्वाचे आहे, ते म्हणजे, आज आपण ज्यांना गावकुसाबाहेरील अंत्यज व आदिवासी असे म्हणतो, त्याचे देखिल मराठी भाषा समृद्ध करण्यामागे मोठे योगदान आहे. आदिवासी समाज हा पुर्णतः निसर्गावर व त्यांचा घटकांवर अवलंबून आहे, म्हणून निसर्ग आणि त्याचे घटक हेच त्यांचे देवीदेवता आहेत. विवाह विधी संपन्न झाला असतो ,आपण तेव्हा “शुभ मंगलं सावधान !”असं म्हणतो; तर आदिवासींची जे गीत आहेत त्यात आवाहन केल जातं ,’सागर देवा साविध’, ‘नदीय देवा साविध रे व्हा’, ‘रुखीया देवा साविध रे व्हा’ ‘शुभमंगलं सावधान !’ असा आशय त्याच्यामधून व्यक्त होत असतो. हा लोकसंस्कृतीचा व भाषेच्या विकासाचा फार मोठा भाग आहे.

स्वराज्यजननी जीजाऊ माँसाहेब, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्यामध्ये मराठीला खास मान व संवर्धन प्रधान करण्यात आले. उदाहरणास्तव, स्वराज्य स्थापनेआधी राजनीती मध्ये विविध भाषांनी राज्यशासनाचे धोरण चालु असे; पण स्वराज्यस्पानेच्या काळी महाराजांनी मुळ मराठी भाषेला प्राधान्य यावे, म्हणून थोर पंडीतांकडून, राजनीतिक विषेशज्ञांकडून राज्यव्यवहार व धोरणांतून स्वराज्य उत्तम रीत्या अग्रसर व्हावं; त्याकरीता ,” राज्यव्यवहारकोश” हा मराठीत लिहून (संपादन) घेतला. तसेच रामचंद्र पंत अमात्य यांचे शिवकालीन “आज्ञापत्र” हे सुद्धा भाषेच्या नजरेने महत्वाचे ठरते. तसेच शिवकालीन मराठीत असलेले पोवाडे, भाकर, ओव्या, गीत आणि कविता आहेतच.

पुढे जाऊन बघितलं तर, मध्ययुगीन कालखंडात अनेक कवि-कवियत्र्यांनी, निबंधकारांनी, कादंबरीकारांनी, लेखकांनी जसे “अशी असावी कविता, फिरून ,तशी नसावी कविता, म्हणून सांगावया कोण तुम्ही कवीला अहांत मोठे ? – पुसतों तुम्हासी.” असे म्हणत केशवसुतांनी ह्या मराठीचा वारसा आपल्या स्वरूपात जपला. काही मोठे ठरावीक क्षण आले, जिथे मराठी ला आदरणीय स्थान मिळाले, ते मग विश्वकोशाची ची निर्मिती असो, साहित्य संमेलने असो, व्युत्पत्तीकोश निर्मीती, शब्दकोशाची निर्मिती किंवा माराठी भाषिक उच्चवर्णीयांनी जसे लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी संस्कृत व इतर भाषेतील साहित्य; वाचकांच्या सोईसाठी मराठीत केलेला उत्तम अनुवाद व न्यायमुर्ती महादेव गोवींद राणडे यांनी केलेले ” मराठी सत्तेचा उत्कर्ष” यामध्ये केलेले उल्लेखनिय काम आसो, किंवा अलिकडे मराठी भाषेला “अभिजात भाषेचा” दर्जा मिळणे असो; हे सर्व मराठीला स्थिरता प्रदान करते. मराठी साहित्याची खरी ऊर्जा लोकपरंपरेतून आली आहे. अशी ही सर्वांना सामावून घेणारी मायबोली काळानुसार प्रगतशील पाऊल टाकत आली आहे.

मराठीचे अमराठी दालन व पाश्चातप्रभाव –

मराठी ही फक्त महाराष्ट्राचीच नसून तीचे रसिकजन अख्या जगाच्या पाठीवर आढळून येतात. ज्ञान, न्याय, अध्यात्म आणि लोकजीवन यांची सांगड घालत मराठीने सीमांच्या पलीकडेही आपला ठसा उमटवला आहे. म्हणूनच मराठीचा प्रभाव हा केवळ भौगोलिक मर्यादांपुरता न राहता, मानवी मूल्यांच्या सार्वत्रिक विश्वातही दृग्गोचर होतो. व्यंकोजीराजे भोसले यांनी थंजोवूर मध्ये राज्य करतांना मराठीचा प्रसार केला. त्याचप्रमाणे, एकट्या महाराष्ट्रात नव्हे तर कर्नाटक, तामिळनाडू, तेलांगन, आंध्रपदेश, गुजरात,पंजाब, दिल्ली, मध्यप्रेदश व उडीशा येथे मराठीने प्रभावी ठसे उमटवले आहेत. संतश्रेष्ठ श्री संत नामदेव महाराज यांचे अंभग सिखधर्मीयांच्या सर्वोच्च धर्मग्रंथ आणि ज्यांस अकरावा, अंतिम आणि शाश्वत गुरू मानला जातो, अश्या “गुरू ग्रंथ साहिब” मध्ये आढळतात. ही मोठी र्गवाची आणि कर्तृत्वाची बाब असून मराठी ही धर्मापलीकडे वसलेली आहे, अस आपल्याला कळतं.

त्याचप्रमाणे, लंडनच्या विख्यात SOAS विद्यापीठामध्ये, जर्मनीतल्या विख्यात विद्यापीठाच्या German Indology विभिगामध्ये, American South Asian Studies Program आणि अश्या कित्येक विश्वविख्यात विद्यापीठांमध्ये वारकरी काव्य, मराठी राजकारण व मराठी श्रीमनुस्मृती यांसारखे अनेक विषयांवर अध्ययन केलं जातं. त्याचप्रमाणे, जगभरात पसरलेल्या मराठी समाजाने प्रस्थापित केलेल्या संस्था मराठी चा अभिमान वाटेल असे काम सातत्यपूर्ण करत आहेत. महाराष्ट्र फाऊंडेशन, (UK / युरोप), मराठी मंडळ, (USA / कॅनडा), सरहद पुणे – गुमान प्रोजेक्ट यांसाखे अनेक संस्था व मराठी वाचक – लेखक संघटना, मराठी साहित्यासाठी नाविण्यपूर्ण प्राश्वभुमी घडवून आणत आहेत. तसेच, विश्व मराठी परिषदेच्यावतीनं साकारण्यात आलेले वैश्विक मराठी साहित्य संमेलने हे सुद्धा जगभरातील मराठी भाषा प्रेमीयांची व रसीकांची मांडीयळी जमवून आणते. परंपरेची पायाभरणी आणि प्रगतीची पंखे या दोन्हींची सांगड घालत मराठीचा प्रवास आजही विश्वमानवतेकडे वाटचाल करीत आहे. अशा या भाषेचा जागतिक प्रभाव हा केवळ इतिहासाचा वारसा नसून, उद्याच्या सृजनशील शक्यतांचा उज्ज्वल संकेत आहे.

आजचे युग व माराठीचा ठेवा –

आज जागतिकीकरणाच्या वेगवान वादळात अनेक भाषा आपल्या अस्तित्वासाठी झुंज देत आहेत; परंतु मराठी ही केवळ टिकून नाही तर नव्या रूपात फुलत आहे. परंपरेच्या गाभाऱ्यात रुजलेली आणि आधुनिकतेच्या प्रकाशात न्हाऊन निघालेली अशी ही भाषा आहे. ज्ञान, विज्ञान, साहित्य, नाटक, चित्रपट, डिजिटल माध्यमे आणि सामाजिक चळवळी—या सर्व क्षेत्रांत मराठीची ठसठशीत छाप उमटताना दिसते. माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात सोशल मीडियावरून व्यक्त होणारा तरुण वर्ग, मराठी ब्लॉग्स, पॉडकास्ट, यूट्यूब चॅनेल्स आणि वेब-सिरीज यांमधून मराठीची सर्जनशील ऊर्जा नव्या पिढीकडे पोहोचते आहे. जागतिक व्यासपीठावर मराठी साहित्याचे अनुवाद होत आहेत; मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय महोत्सवांत दाद मिळते आहे; आणि मराठी विचारसरणीतील सामाजिक संवेदनशीलता जगभरातील चर्चांना नवे संदर्भ देत आहे. मराठी ही केवळ संवादाची भाषा नाही—ती विचारांची दिशा आहे, संस्कृतीची ओळख आहे आणि अस्मितेचा आधार आहे. संतवाङ्मयातील सार्वत्रिक मानवतावाद, लोकपरंपरेतील जिवंतपणा, आणि आधुनिक लेखकांच्या लेखणीतून उमटणारा बौद्धिक प्रखरपणा—या सर्वांचा संगम आजच्या जगाला अधिक मानवी बनविण्याची ताकद ठेवतो. म्हणूनच मराठीचे भविष्य केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नाही. ती जगाशी संवाद साधणारी, स्वतःची परंपरा जपत नवे क्षितिजे गाठणारी भाषा आहे. तिच्या शब्दांमध्ये केवळ इतिहास नाही, तर उद्याचे स्वप्नही दडलेले आहे. मराठी जिवंत आहे, जागतिक आहे, आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे—ती माणुसकीची भाषा आहे.

माझे स्वमत –

मराठीला अभिजात दर्जा मिळाला असला तरी तिचे भविष्य केवळ गौरवगाथांवर नाही, तर व्यवहारातल्या वापरावर मोठ्यापतळीवर ठरते, अस मला वाटतं. शिक्षणात मराठीचा आग्रह, संशोधनात मराठी माध्यम, लोकसाहित्याचा सन्मान आणि जागतिकतेशी स्पर्धा करतानाही मातृभाषेची जपणूक, हे सर्व मराठीच्या प्रसार व संरक्षणासाठी सक्षमरीत्या पोशक ठरेल. कालीदासांनी लिहिलेल्या “मालविकाग्निमित्रम्’ या नाटकातील पहिल्या अंकात, कालिदास म्हणतात,” पुराणमित्येव न साधु सर्वं, न चापि काव्यं नवमित्यवद्यम्। सन्तः परीक्ष्यान्यतरद्भजन्ते, मूढाः परप्रत्ययनेयबुद्धिः॥” अर्थात सर्व काही जुने आहे म्हणून चांगले नाही. किंवा नवीन काम केवळ नवीन आहे म्हणून दोषपात्र नाही. शहाणे दोघांचे परीक्षण करतात आणि योग्य ते निवडतात. मूर्ख लोक फक्त इतरांच्या मतांवर अवलंबून असतात. ह्याच अनुशंगाने आपल्याला,”हे अभिजनांचे आहे …..” किंवा ” हे सर्व लोकपरंपरेतून आले आहे, मला ह्याची काय गरज ?” तसेच, ” हे आदिमकाळापासून आलय ? हे प्राकृत भाषेत आहे …”,” हे गौण आहे …… “,”हे अंत्यज आहे …..”,” हे शुद्ध आहे….. “,”ते शुद्ध नाही…. “;असे भेद करण्यापरस आपण त्यामागील तथ्य व बोध जानुन घ्यायला हवा.

अशी ही माझी, तुमची ,आपल्या सर्वांची लोकभाषा, राजभाषा, ज्ञानभाषा, अभिजातभाषा, संस्कारभाषा, संतभाषा, शौर्यभाषा, स्वाभिमानभाषा, साहित्यभाषा, विज्ञानभाषा, संस्कृतीभाषा , विश्वसंवादभाषा व अभिमानभाषा असलेली मायबोली मराठी म्हणजे मन, मातीतली माया, मूल्यांची मशाल, माणुसकीची मूक पण मर्मस्पर्शी महती. म्हणूनच आधुनिकतेच्या महासागरातही मराठीची मुक्त, मोलाची, महाकाय आणि मानवतेला मार्गदर्शक अशी महनीय मशाल सतत प्रज्वलित राहील, हीच आमची मनीषा आणि मराठीप्रेमींची मंगलमय मनोवृत्ती.

Don`t copy text!