Home Breaking News कॉपी प्रकरणात शिक्षक सहभागी?बारावीच्या राज्यशास्त्र विषयाच्या पेपरमध्ये कॉपी प्रकरण उघडकीस…

कॉपी प्रकरणात शिक्षक सहभागी?बारावीच्या राज्यशास्त्र विषयाच्या पेपरमध्ये कॉपी प्रकरण उघडकीस…

117

कॉपी प्रकरणात शिक्षक सहभागी?
जिल्हा संपादक नितेश खडसे | दि. 22 फेब्रुवारी 2026
बारावीच्या राज्यशास्त्र विषयाच्या पेपरमध्ये कॉपी प्रकरण उघडकीस आल्यानंतर शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. परीक्षा केंद्रावर उत्तरांच्या कॉपी परिघराच्या (परिचर) खिशात आढळल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाले असून या प्रकरणात शिक्षकांच्या सहभागाबाबतही संशय व्यक्त केला जात आहे.
माहितीनुसार, चामोर्शी येथील जाकृ बोमनवार महाविद्यालय येथे परीक्षा केंद्रावर राज्यशास्त्र विषयाचा पेपर सुरू असताना संशयास्पद हालचाली आढळल्या. तपासादरम्यान एका परिचराच्या खिशात विद्यार्थ्यांच्या उत्तरांच्या कॉपी आढळून आल्या. या घटनेनंतर केंद्र प्रशासन तसेच शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात तीन शिक्षकांची नावे पुढे आल्याची चर्चा असून शिक्षण क्षेत्रातील पारदर्शकता आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. स्थानिक पालक आणि नागरिकांनी या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी परीक्षा केंद्राची पाहणी करून प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार असून दोषी आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या घटनेनंतर परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या असून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित अशा गंभीर प्रकारांना आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज व्यक्त केली जात आहे.
संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. उर्वरित पेपर सुरळीत पार पडण्यासाठी सोमवार महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर इतर शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
– सुहास गाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. गडचिरोली.

Don`t copy text!