Home Breaking News मागील ५ दिवसांपासून वीज खंडित; नागरिकांचा संताप वाढला…

मागील ५ दिवसांपासून वीज खंडित; नागरिकांचा संताप वाढला…

192

मागील ५ दिवसांपासून वीज खंडित; नागरिकांचा संताप वाढला
कवीश्वर मोतकुरवार लाहेरी :
लाहेरी परिसरात मागील पाच दिवसांपासून वीज पुरवठा खंडित असल्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास लाहेरीवरून जाणाऱ्या टिपरने वीज खांबाला धडक दिल्याने चार ते पाच वीज खांब तुटले आणि तारा जमिनीवर पडल्या. त्यानंतर परिसरातील वीज पुरवठा पूर्णपणे बंद झाला.
घटनेनंतर संबंधित विभागाला कळविण्यात आले असून भामरागड वीज विभागातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. पहिल्या दिवशी काही प्रमाणात काम सुरू झाले, मात्र दुसऱ्या दिवशी अपेक्षित गतीने दुरुस्ती झाली नाही. तिसऱ्या दिवशी सकाळी काम सुरू झाले असले तरी अभियंता अचानक अनुपस्थित राहिल्याने काम पुन्हा अर्धवट राहिले.
या घटनेमुळे लाहेरी परिसरातील सुमारे १० ते १२ गावे अंधारात असून नागरिकांना पाणीपुरवठा, मोबाईल नेटवर्क, व्यवसाय आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर मोठा परिणाम झाला आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही वीज पुरवठा सुरळीत करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
दरम्यान, नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा आरोप करत लवकरात लवकर नवीन अभियंता नियुक्त करून वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. अन्यथा मोठे आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

Don`t copy text!