Home Breaking News नारायणपूर–गडचिरोली सीमेवर मोठी चकमक; एक माओवादी ठार, एके-४७सह शस्त्रसाठा जप्त; सी-६० जवान...

नारायणपूर–गडचिरोली सीमेवर मोठी चकमक; एक माओवादी ठार, एके-४७सह शस्त्रसाठा जप्त; सी-६० जवान जखमी

1243

नारायणपूर–गडचिरोली सीमेवर मोठी चकमक; एक माओवादी ठार, एके-४७सह शस्त्रसाठा जप्त; सी-६० जवान जखमी

मुख्य संपादक प्रशांत शाहा

भामरागड
दिनांक ३ फेब्रुवारीच्या संध्याकाळी कंपनी क्रमांक १० चे उर्वरित माओवादी सदस्य तसेच छत्तीसगडमधील अज्ञात माओवादी दलमच्या हालचालींबाबत मिळालेल्या विश्वसनीय माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी, भामरागड यांच्या नेतृत्वाखाली त्याच रात्री १४ सी-६० पथकांसह मौजा फोदेवाडा गावाच्या काही किलोमीटर अंतरावर, नारायणपूर–गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर व्यापक शोधमोहीम सुरू करण्यात आली.
काल दिवसा राबविण्यात आलेल्या अभियानादरम्यान माओवाद्यांशी काही काळ चकमक झाली. या चकमकीत माओवाद्यांचे दोन तळ उद्ध्वस्त करण्यात आले असून मोठ्या प्रमाणात माओवादी साहित्य जप्त करण्यात आले आहे. मात्र, अतिशय प्रतिकूल भूभाग आणि घनदाट जंगलामुळे माओवादी पसार होण्यात यशस्वी झाले.
आज सकाळी शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात येत अतिरिक्त ०४ सी-६० पथक आणि सीआरपीएफ क्यूएटीचे ०१ पथक अभियानासाठी पाठवण्यात आले. आज सकाळपासून माओवाद्यांशी अधूनमधून चकमक सुरू असून आतापर्यंत एका पुरुष माओवादीचा मृतदेह आढळून आला आहे. त्याच्याजवळून ०१ एके-४७ व ०१ एसएलआर रायफल अशी अग्निशस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. आणखी माओवादी जखमी किंवा ठार झाले असण्याची शक्यता असून त्याबाबत पडताळणी सुरू आहे. मृत माओवादीची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही.
दरम्यान, आज संध्याकाळी उशिरा माओवाद्यांनी केलेल्या जोरदार गोळीबारात सी-६० पथकाचा एक जवान गोळी लागून जखमी झाला असून त्याला तातडीने पुढील उपचारासाठी बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सदर जंगलपरिसरात शोधमोहीम सुरूच असून अभियान पूर्ण झाल्यानंतर गडचिरोली पोलीस दलाकडून सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.

Don`t copy text!