मुलचेरा तालुक्यातील अनुसूचित जमाती शेतकऱ्यांसाठी कृषी प्रशिक्षण व निविष्ठा वितरण कार्यक्रम संपन्न
मुख्य संपादक प्रशांत शाहा

मुलचेरा तालुक्यातील बोलेपल्ली येथे अनुसूचित जमाती शेतकऱ्यांच्या कृषी विकासासाठी भा.कृ.अनु.प.–केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर यांच्या वतीने “शेतकरी प्रशिक्षण व कृषी निविष्ठा वितरण कार्यक्रम” उत्साहात संपन्न झाला. हा कार्यक्रम केंद्र शासन पुरस्कृत अनुसूचित जमाती विकास कृती आराखडा (DAPST Plan) अंतर्गत आयोजित करण्यात आला होता.
हा उपक्रम डॉ. व्ही. एन. वाघमारे, संचालक, भा.कृ.अनु.प.–केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर तसेच डॉ. दीपक टी. नगराळे, वरिष्ठ शास्त्रज्ञ (वनस्पती रोगशास्त्र) व कार्यक्रम समन्वयक यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या राबविण्यात आला.
या कार्यक्रमात उपस्थित अनुसूचित जमाती शेतकऱ्यांना फवारणी संरक्षण किट, लपेटा पाईप, जैविक खते तसेच पाण्यात विरघळणारे १९:१९:१९ (नत्र : स्फुरद : पालाश) खते यांसह विविध कृषी निविष्ठांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमास संस्थेचे श्री. आर. एम. रामटेके (वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक), श्री. एस. एम. मराठे (ग्राम अधिकारी), श्री. आकाश लवटे (आत्मा, कृषी विभाग, मुलचेरा), श्री. गणेश हलामी (सरपंच), श्री. सारंग श्रीरामे (वाई. पी. १) तसेच गावातील प्रगतशील शेतकरी श्री. संदीप मट्टामी यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी श्री. आर. एम. रामटेके यांनी कापूस पिकातील तण नियंत्रण, धान, कापूस व चना पिकांवरील किड व रोग व्यवस्थापन तसेच खत व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर श्री. एस. एम. मराठे यांनी गावातील विविध शासकीय योजनांची माहिती दिली. श्री. आकाश लवटे यांनी कृषी विभागाच्या योजना व बचत गटांच्या माध्यमातून होणाऱ्या लाभांविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन श्री. सारंग श्रीरामे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. संदीप मट्टामी यांचे विशेष सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाचा लाभ बोलेपल्ली (मुलचेरा) येथील एकूण ६० अनुसूचित जमाती शेतकऱ्यांनी घेतला. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती मिळून उत्पादन वाढीस चालना मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.







