Home Breaking News अबुजमाडमध्ये मोठी चकमक : तीन माओवादी ठार, C-60 जवान दिपक मडावी यांना...

अबुजमाडमध्ये मोठी चकमक : तीन माओवादी ठार, C-60 जवान दिपक मडावी यांना वीरमरण; एक जवान जखमी…

2109

अबुजमाडमध्ये मोठी चकमक : तीन माओवादी ठार, C-60 जवान दिपक मडावी यांना वीरमरण; एक जवान जखमी


जिल्हा संपादक नितेश खडसे गडचिरोली
अबुजमाड परिसरात सुरू असलेल्या नक्षलविरोधी अभियानादरम्यान आज सकाळी घटनास्थळावरून आणखी दोन माओवादी (एक पुरुष व एक महिला) यांचे मृतदेह हस्तगत करण्यात आले. यापूर्वी एका माओवादीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे आतापर्यंत एकूण तीन माओवादी (दोन पुरुष व एक महिला) ठार झाले असून त्यांच्याकडून एक एके-४७ रायफल व एक एसएलआर शस्त्र जप्त करण्यात आले आहे. तिन्ही माओवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.
या तीव्र चकमकीदरम्यान C-60 पथकातील जवान दिपक चिन्ना मडावी (वय ३८), सध्या राहणार अहेरी व मूळ रा. मांड्रा, दामरांचा, ता. अहेरी हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना आज पहाटे अबुजमाडमधील घनदाट जंगलातून हेलिकॉप्टरच्या मदतीने उपजिल्हा रुग्णालय, भामरागड येथे दाखल करण्यात आले. मात्र अभियानादरम्यान झालेल्या गंभीर जखमांमुळे उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कर्तव्य बजावताना त्यांनी प्राणार्पण केल्याने त्यांना वीरमरण आले आहे.
याच अभियानादरम्यान आणखी एक जवान जोगा मडावी (रा. किष्टयापल्ली) हे रात्री गोळी लागून जखमी झाले होते. त्यांनाही हेलिकॉप्टरच्या मदतीने सुरक्षितपणे बाहेर काढून भामरागड येथे आणण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून पुढील उपचारांसाठी त्यांना लवकरच हेलिकॉप्टरद्वारे गडचिरोली येथे हलविण्यात येणार आहे.
दरम्यान, संबंधित जंगल परिसरात सुरक्षा दलांकडून व्यापक शोध मोहीम सुरू असून परिस्थितीवर गडचिरोली पोलीस सतत लक्ष ठेवून आहेत. या अभियानासंदर्भात पुढील माहिती गडचिरोली पोलिसांकडून अधिकृतपणे देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Don`t copy text!