चामोर्शी नगरपंचायतीसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी
प्रतिनिधी गौरव बुरांडे

चामोर्शी : नगरपंचायत चामोर्शी अंतर्गत नागरिकांना तातडीच्या वैद्यकीय सेवेचा लाभ मिळावा यासाठी गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मिलिंद भाऊ नरोटे यांनी स्थानिक आमदार विकास निधीतून एक रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटना गडचिरोली जिल्हा अध्यक्ष रमेश अधिकारी यांनी केली आहे.
चामोर्शी शहर व परिसरातील ग्रामीण भागात अपघात, प्रसूती तसेच गंभीर आजाराच्या रुग्णांना वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. अनेक वेळा रुग्णांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो, ज्यामुळे आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत नगरपंचायतीसाठी स्वतंत्र रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असे मत रमेश अधिकारी यांनी व्यक्त केले.
लोकप्रिय आमदार मिलिंद भाऊ नरोटे हे नेहमीच जनतेच्या आरोग्य व मूलभूत सुविधांसाठी तत्पर असल्याने त्यांनी या मागणीचा सकारात्मक विचार करून तात्काळ रुग्णवाहिका मंजूर करावी, अशी अपेक्षा देखील यावेळी व्यक्त करण्यात आली आहे.
रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यास आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेवर उपचार मिळून अनेकांचे प्राण वाचू शकतील, तसेच नगरपंचायत चामोर्शीच्या आरोग्य सेवेला बळकटी मिळेल, असेही रमेश अधिकारी यांनी सांगितले.







