शासकीय आश्रम शाळा रेगडी येथे निरोप समारंभ व स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
प्रतिनिधी गौरव बुरांडे घोट
रेगडी : शासकीय आश्रम शाळा रेगडी येथे इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला निरोप समारंभ तसेच वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील एक संस्मरणीय क्षण अधोरेखित केला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंचा सौ. सुरेखा गेडाम यांच्या शुभहस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना जिल्हा सचिव प्रशांत शाहा, पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक कुणाल इंगळे, पोलिस उपनिरीक्षिका माधुरी शेलार तसेच सामाजिक कार्यकर्ते उमेश मल्लिक हे उपस्थित होते. यावेळी शाळेचे शिक्षकवृंद, कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नृत्य, गीत, नाटिका, समूहगायन अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. या सादरीकरणातून विद्यार्थ्यांची कला, आत्मविश्वास व सृजनशीलता दिसून आली. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला उपस्थित मान्यवरांनी व पालकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.
यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणाचे महत्त्व, शिस्तीचे पालन, सातत्यपूर्ण मेहनत तसेच समाजाप्रती असलेली जबाबदारी याबाबत मोलाचे विचार व्यक्त केले. दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक व जीवनातील वाटचालीसाठी शुभेच्छा देत उज्ज्वल भवितव्याच्या कामना करण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक दोनाडकर सर, देव बनसोड सर, केळकर सर, कुसराम सर तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. या स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंद, उत्साह व आपुलकीचे वातावरण निर्माण झाले.








