सुरेश भाऊ शाहा व्हॉलीबॉल प्रीमियर लीगचे बक्षीस वितरण संपन्न…
प्रतिनिधी गौरव बुरांडे
रेगडी : चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथे आयोजित करण्यात आलेल्या सुरेश भाऊ शाहा व्हॉलीबॉल प्रीमियर लीग या भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेचा समारोप उत्साहात पार पडला. स्पर्धेचे अंतिम सामने पार पडल्यानंतर आज निकाल जाहीर करण्यात आले असून विजेत्या संघाला आकर्षक बक्षीस व मानाची शिल्ड देऊन गौरविण्यात आले.
ग्रामीण भागातील युवकांना क्रीडेमध्ये प्रोत्साहन मिळावे तसेच त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेदरम्यान खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रेक्षकांची मने जिंकली.
बक्षीस वितरण समारंभास क्षेत्रातील माजी आमदार डॉ. देवराव होळी, भाजपाचे जिल्हा सचिव दिलीप चलाख, भाजपा बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश शाहा, सामाजिक कार्यकर्ते देवराव खंडरे, शिवसेना जिल्हा सचिव प्रशांत शाहा आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघाला बक्षीस व शिल्ड प्रदान करण्यात आली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचे कौतुक करत अशा स्पर्धांमुळे ग्रामीण भागातील युवकांना सकारात्मक दिशा मिळते, असे प्रतिपादन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक, स्वयंसेवक व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.







