मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला.
मेहा (बुज.), ता. सावली, जि. चंद्रपूर:
संघर्ष क्रीडा मंडळ, मेहा (बुज.) यांच्या वतीने आयोजित “३ दिवसीय डे-नाईट भव्य कबड्डी स्पर्धा २०२५” चा शुभारंभ अत्यंत उत्साहवर्धक आणि पारंपरिक वातावरणात पार पडला.
या सोहळ्याचे उद्घाटन माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व फित कापून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. गावातील युवक, खेळाडू, महिला व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी उद्घाटन प्रसंगी बोलताना म्हणाले —“कबड्डी हा आपल्या मातीचा खेळ — शरीर, मन आणि संघभावना मजबूत करणारा!”
ग्रामीण परंपरेला साजेशी कबड्डी स्पर्धा उत्साहात सुरू झाली.
“गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मी सिन- शिनेरीला उद्घाटनासाठी येणार होतो, पण त्या वेळेला योग आला नाही. मात्र आज कबड्डीच्या निमित्तानं आपल्या गावी येण्याचं भाग्य लाभलं, ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. त्या वेळी योग नव्हता, पण आज हे भाग्य लाभलं म्हणून मन आनंदानं भरून आलंय.
पुढे बोलत म्हणाले “या गावातील दोन कबड्डीपटू इतर विविध ठिकाणी जाऊन उत्तम खेळ दाखवतात. त्यांचा खेळ बघितला की अभिमान वाटतो. हे दोघंही मुलं अलौकिक प्रतिभावान आहेत. अशी भावना सर्वांचीच आहे की, हे खेळाडू एक दिवस जिल्हा, विभाग स्तरातून आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत भाग घेऊन नाव उज्ज्वल करतील. मीही मनःपूर्वक त्यांना शुभेच्छा देतो.”
“कबड्डी हा खेळ आता दिवसेंदिवस लोप पावत चाललाय. आजकालचे तरुण मोबाईलमध्ये गुंतलेले दिसतात, क्रिकेटकडे आकर्षित झालेत; पण कबड्डी हा आपला मातीचा, मैदानी आणि सांघिक खेळ आहे. या खेळामुळे शरीर तंदुरुस्त, मन निरोगी आणि संघभावना दृढ राहते. त्यामुळे कबड्डीला पुन्हा जोमाने पुढं आणणं गरजेचं आहे.”
“मी माझ्या दहा वर्षांच्या खासदारकीच्या काळात जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले. वडसा गडचिरोली रेल्वे तसेच रेल्वेचं जाळं जिल्ह्यात आणलं, मेडिकल कॉलेज, गोंडवाना विद्यापीठ, कृषी महाविद्यालय, एकलव्य विद्यालय, सुरजागड लोह प्रकल्प, चिचडोह आणि कोटगल बॅरेजेस अशी अनेक विकासकामं पूर्ण केली. रस्ते, नॅशनल हायवे या सगळ्या क्षेत्रातही काम केलं. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिलेल्या सहकार्याबद्दल आपल्या गावचे आभार व्यक्त करतोय. निवडणुकीत पराभव झाला असला तरी मी न थकता, आपल्या माध्यमातून प्रामाणिकपणे जनतेसाठी काम करत राहीन. हीच माझी बांधिलकी आहे.
“कबड्डीचा जयघोष गावागावात घुमला पाहिजे. मैदानावरून ताकद, चिकाटी आणि संघभावनेचा संदेश गेला पाहिजे. हा खेळ फक्त खेळ नाही — तो आपल्या संस्कृतीचा वारसा आहे.”असे प्रतिपादन मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांनी उद्घाटन प्रसंगी केले.
या भव्य उद्घाटन सोहळ्याला भाजपा तालुकाध्यक्ष किशोर भाऊ वाकुडकर, धात्रक ब्रदर्स प्रॉपर्टी डीलर्स तथा भाजपा युवा नेते जितुभाऊ धात्रक, सरपंच रुपेश रामटेके, पो.पा. लोमेश श्रीकोंडावार, भाजपाचे नेते पुनम झाडे, जितु सोनटक्के, सुरज किनेकर, किशोर खेडेकर, मनोहर कोलते,शा.व्य.क.अध्यक्ष प्रकाश कोलते, सुधामजी धात्रक, राजुभाऊ निकुरे, अरुण गंडाटे, निकेश ठाकरे, दिलिप मलोडे, महेंद्र ठाकरे, वामन ईरमलवार, गोपिचंद बोरकुटे, वामन दडमलवार,कार्यक्रमाचे संचालन मनोज तरारे आदी मान्यवर उपस्थित होते.
संघर्ष क्रीडा मंडळाचे अध्यक्ष ऐपाज कुरेशी, वैभव ठाकरे, डियम कोलते, मंगेश करकाडे, अनिल भोयर, नुतन चिमुरकर तसेच मंडळाचे सदस्य यांनी कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी अथक प्रयत्न केले.
या प्रसंगी जितुभाऊ धात्रक यांनी बोलताना म्हटलं — “खेळाच्या माध्यमातून खेळाडूंना प्रेरणा मिळावी, आपल्या गावाचं नाव उंच व्हावं आणि गावाचा विकास व्हावा, यासाठी माझी नेहमीच तळमळ आहे. युवकांनी खेळातून आत्मविश्वास व शिस्त अंगीकारावी.”
तसेच किशोर वाकुडकर यांनीही खेळाडूंना प्रोत्साहनपर मार्गदर्शन देत, खेळाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास व आवड निर्माण व्हावी यासाठी आपले लोकनेते माजीमंत्री सुधिरभाऊ मुनगंटीवार साहेब यांचे ही विशेष प्रयत्न सुरु आहेत “खेळामुळे शरीर व मन निरोगी राहते. समाज उभारणीत क्रीडांगणाची भूमिका महत्त्वाची आहे,”
असे विचार मांडले.
३ दिवस चालणाऱ्या या कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्रातील अनेक नामांकित संघ सहभागी होत असून, सर्व सामने रात्रीच्या उजेडात खेळविले जाणार आहेत. कबड्डीप्रेमींसाठी हा क्रीडा सोहळा एक पर्वणीच ठरणार आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी संघर्ष क्रीडा मंडळाचे अभिनंदन करत “युवकांनी क्रीडांगणातून समाज उभारणीसाठी पुढे यावे, आणि आपल्या गावी गौरव मिळवावा,”
असे आवाहन केले.