राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियमितीकरणास होत असलेल्या विलंबाबाबत माजी आमदार डॉ. देवराव होळी यांना निवेदन…

220

प्रतिनिधी नितेश खडसे

गडचिरोली :
राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियमित शासन सेवेत समायोजनाबाबत दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न तातडीने निकाली काढावा, या मागणीसाठी आज गडचिरोली येथे कर्मचाऱ्यांच्या वतीने माजी आमदार डॉ. देवराव होळी यांना निवेदन सादर करण्यात आले.

गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य सेवेत कार्यरत असलेले डॉक्टर, नर्स, तंत्रज्ञ व इतर कंत्राटी कर्मचारी कठीण परिस्थितीत सेवा बजावत असूनदेखील त्यांना शासन सेवेत समायोजनाची प्रतीक्षा आहे. या विलंबामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष वाढत असून त्याचा परिणाम थेट आरोग्य सेवेच्या गुणवत्तेवर होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, शासनाने नियमितीकरणाबाबत अनेकदा आश्वासने दिली, मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. कोरोनाच्या काळातही या कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून सेवा दिली, तरीही त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली.

यावेळी माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी कर्मचाऱ्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले. त्यांनी सांगितले की, “आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण हा न्याय्य व मानवतावादी मुद्दा आहे. शासनाने 13/3/2024 रोजी मंत्री मंडळ बैठकीत कंत्राटी कर्मचाऱ्यांना 10 वर्ष झाल्यावर 70% व 30% 10 वर्ष पूर्ण झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम स्वरूपी समायोजन करण्याचे परिपत्रक काढले होते. त्याची अंमलबजावणी करावी या साठी शासनाकडे पाठपुरावा करून शासनाने हा प्रश्न तातडीने सोडवावा अशी विनंती करणार.”