प्रतिनिधी संकेत कायरकर
दिनांक:२१ ऑगस्ट
दोन दिवस अगोदर सायंकाळी आनंदवन चौक, वरोरा येथे मुख्य रस्त्यावर लंपी आजाराने त्रस्त पिलू पडल्याचे आकाश काकडे व ईश्वर ठाकरे यांच्या लक्षात आले. त्यांनी त्वरित डॉक्टरांना बोलावून पिल्याचा उपचार केला. यादरम्यान पिल्याची आई दिसत नसल्याने पावसापासून बचाव करण्यासाठी पिलाला आडोश्यात ठेवून दूध पाजण्यात आले.
दुसऱ्या दिवशी सकाळी काही नागरिकांनी माहिती दिली की एक गाय पाठीमध्ये चाकू लागलेली फिरत आहे. जागेवर जाऊन पाहिले असता ती गाय त्या पिलाचीच आई असल्याचे समजले. स्थानिक नागरिक व डॉक्टरांच्या मदतीने गायीच्या पाठीतील चाकू काढून तिच्यावर तत्काळ उपचार करण्यात आले तसेच पोलिसांना बोलावण्यात आले. अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा नोंदवून गायीला गोशाळेत हलविण्यात आले असून पिल्यासह तिच्यावर पुढील उपचार सुरू आहेत.
या संपूर्ण घटनेत नागरिकांमध्ये रोष दिसून आला, परंतु मुक्या प्राण्यांच्या उपचारासाठी आवश्यक सोयीसुविधा, सुरक्षित जागा आणि मदत उपलब्ध करून देण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही, अशी खंत व्यक्त करण्यात आली. आतापर्यंत या कार्याचा संपूर्ण खर्च आकाश काकडे व ईश्वर ठाकरे आणि त्यांचे सहकारी स्वतः करत आहेत. शासन, प्रशासन, प्रतिनिधी व समाजसेवकांकडे सातत्याने मागणी करूनही ठोस मदत मिळत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. तरीही शासकीय मदत मिळेपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही, असा निर्धार प्राणीमित्र आकाश काकडे यांनी व्यक्त केला आहे.