जीवतीच्या जंगलातून गारगोटिची राजस्थानात तस्करी… टोळी सक्रिय; मौल्यवान वस्तू बनविण्याच्या कामात वापर..

518

जिवती (ता. प्र.) : तालुक्यातील जंगलामध्ये आढळणारा पांढराशुभ्र चमकणाऱ्या दगडाची ओळख गारगोटी म्हणुन केली जाते, राष्ट्रीय बाजारात याची मोठ्या प्रमाणात मागणी आहे व याला चांगली किंमतही आहे. याचाच फायदा घेत तालुक्यातील व गडचांदूर येथील काही दलालांनी या अवैध धंद्याद उडी घेतली आहे.

जिवती तालुक्यातील चोपणगुडा, पुनागुडा, नाईकनगर, गणेरी, कलगुडी, भाईपठार, कावळगोंदी आदी गावातील जंगल परिसरातून मजुरामार्फत गारगोटी गोळा करून तालुक्यातील नाईकनगर येथील दलालाकडे साठा करुन ठेवली जात असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.
तालुक्यातील जंगलामध्ये आढळणाऱ्या पांढऱ्याशुभ्र गारगोटीचा वापर शोभेच्या वस्तु बनविण्यासाठी केला जातो. तालुक्यातील मजुरांकडून गारगोटी विस ते पंचविस रुपये प्रति किलो दराने घेवून तस्कर दलालांना शंभर ते दिडशे रुपये प्रति किलो दराने विकत असल्याची माहिती समोर आली आहे.

– अशी होते गारगोटीची अवैध वाहतुक
गारगोटी गोळा करून ट्रक आणि कंटेनरच्या माध्यमातुन जिवती तालुक्यातील नगराळा, माणिकगड, गडचांदूर आदिलाबाद, नांदेड औरंगाबाद मार्गे तसेच नाईकनगर, भेंडवी, बल्लारपूर, मार्गे औरंगाबाद व तेथुन राजस्थान राज्यातील जयपुर शहरामध्ये नेली जाते. गारगोटी तस्कर व दलालांनी वन विभागाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा गोरखधंदा अनेक वर्षांपासून सुरु असुन वन विभाग याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करत असल्याची चर्चा रंगत आहे. वन विभाग वन संपतीची तस्करी करणाऱ्या तस्करांच्या मुसक्या आवळणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कोट – विरुर वनपरिक्षेत्र हद्दीतील जंगलात वनविभागाच्या पथकाकडून नियमित गस्त घालने सुरू आहे. या क्षेत्रातून गारगोटीच्या तस्कराचा प्रकार आढळला नाही. सबंधित गावकऱ्यांनीही विभागाकडे तक्रारी नाहीत. असा प्रकार आढळत असेल, तर चौकशी करून नियमान्वये कडक पावले उचलण्यात येतील.
– श्री. डी. एम. पवार, वन परिक्षेत्र अधिकारी, विरुर