Homeनागपूरदुर्गंधी पसरणार नाही तर काय? २५० मेट्रिक टन कचरा रोज पडूनच!

दुर्गंधी पसरणार नाही तर काय? २५० मेट्रिक टन कचरा रोज पडूनच!

दिनेश मंडपे (कार्यकारी संपादक)

नागपूर : नागपूर शहरातील कचरा संकलनाची जबाबदारी बीव्हीजी व एजी एन्व्हायरो या दोन कंपन्यांकडे आहे. शहरातून दररोज ११०० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. परंतु, यातील जवळपास २५० मेट्रिक टन कचरा उचललाच जात नाही. शहराच्या विविध भागात हा कचरा तसाच पडून राहतो. प्रामुख्याने शहरालगतच्या परिसरात फेरफटका मारला तर जागोजागी कचरा साचलेला दिसतो. कंपन्यांचे कचरा संकलन कोलमडल्याचे चित्र आहे.

शहराच्या सर्व भागातील कचरा उचलला जावा, या हेतूने बीव्हीजी व एजी एन्व्हायरो या दोन कंपन्यांकडे प्रत्येकी पाच झोनमधील कचरा उचलण्याची जबाबदारी सोपविली आहे. मात्र, यापेक्षा महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे ही जबाबदारी ठेवून मनुष्यबळ उपलब्ध केले असते तर शहरातील कचऱ्याची समस्या निकाली निघाली असती. परंतु, खासगी कंत्राटदारांकडे जबाबदारी असल्याने समस्या कायम आहे. दुसरीकडे वजन वाढविण्यासाठी कचऱ्यात माती आणि सिमेंटयुक्त रेतीची भेसळ केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. गतकाळात हा प्रकार उघडकीस आला होता. कंपनीवर कारवाईसुद्धा झाली होती. परंतु, अजूनही हा प्रकार थांबलेला नाही.

क्यू आर कोडचा प्रकल्प बारगळला

घरातील कचरा उचलला की नाही याची इत्यंभूत माहिती क्यू आर कोडच्या माध्यमातून मिळणार होती. दोन वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करून तेलंगखेडी येथे प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प सुरू करण्यात आला होता. परंतु, हा प्रकल्प काही दिवसांतच बारगळला आहे. नागरिकांच्या घरांवर लावलेल्या कोडच्या स्टिकरवरून कचरा उचलला की नाही याची माहिती मनपा प्रशासनाला मिळणार होती.

फ्लॅटमधील कचरा कोण उचलणार?

कंपन्याकडून शहरातील फ्लॅट स्किममधील कचरा उचलला जात नाही. यामुळे कचरा तसाच पडून राहतो. काही फ्लॅटधारक कचरा रस्त्यांवर आणून टाकतात. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आले आहे. याला कंपन्याच जबाबदार असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

दोन कोटींच्या डस्टबिन चोरीला

स्वच्छ शहरासाठी महापालिकेकडून विविध उपक्रमांसोबतच प्रकल्पही राबविण्यात येतात. शहरातील प्रमुख रस्त्यावर दोन कोटी खर्च करून ४०० डस्टबिन लावण्यात आल्या होत्या. परंतु, सद्य:स्थितीत या डस्टबिनची दुरवस्था झाली आहे. यातील कचरा उचलला जात नाही, तर काही ठिकाणच्या डस्टबिन चोरीला गेलेल्या आहेत.

ओला-सुका कचरा एकत्रच

कंपन्यांनी ओला आणि सुका कचरा वेगवेगळा संकलित करणे आवश्यक आहे. परंतु, अजूनही ६० टक्के कचरा एकत्रच गोळा केला जातो. परिणामी संकलन केंद्रावर ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करताना अडचणी येतात.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!