तेली समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळालेच पाहिजेत- प्रकाश देवतळे

140

राजुरा: महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभेची बैठक संत संताजी जगनाडे महाराज सांस्कृतिक सभागृह, सास्ती टी पॉईंट, रामपूर राजुरा येथे नुकतीच संपन्न झाली.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शंकरराव बानकर, अध्यक्ष, श्री संत संताजी जगनाडे महाराज शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा यांची उपस्थिती होती. प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश देवतळे हे होते. तर प्रमुख अतिथी म्ह्णून अजय वैरागडे , जिल्हाध्यक्ष, निलेश बेलखेडे, युवा जिल्हा अध्यक्ष, आशिष देवतळे, युवा जिल्हा कार्याध्यक्ष, छबु वैरागडे, महिला विभागीय कार्याध्यक्ष, श्रुती घटे, महिला जिल्हा अध्यक्ष, राहुल क्षिरसागर, आनंद जुमडे,अतुल क्षिरसागर आदींची प्रामुख्याने उपस्थीती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत संतांजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व स्वर्गीय अनुसया विठ्ठलराव बावणे रा. धोपटाळा कॉलनी यांचे दिर्घ आजाराने निधन झाले त्यामुळे मौन धारण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी उपस्थिती समाज बांधवांना मार्गदर्शन करताना प्रकाश देवतळे म्हणाले, बदलत्या काळात तेली समाजाला अधिक प्रभावीपणे कार्यरत राहून तेली समाजातील विविध घटकांच्या विकासासाठी प्रयत्नशील राहावे लागेल. बहुसंख्य असलेल्या तेली समाजाला राजकीय दृष्टया योग्य प्रतिनिधित्व मिळालेच पाहिजेत याकरिता सुध्दा सर्वांना एकत्रीत यावे लागेल. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभेच्या राजुरा तालुका व शहर पुरुष, महिला, युवक-युवती या कार्यकारणी करिता संभावित नावांची चर्चा केली आणि निवळ झालेल्या कार्यकारणीला 28 ऑक्टोबर ला नागपूर येथे होणाऱ्या बैठकीत नियुक्तीपत्र देण्यात येईल असे सांगण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बादल बेले यांनी केले. प्रास्ताविक पुरुषोत्तम गंधारे यांनी केले तर आभार प्रा. प्रफुल्ल शेंडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशवितेकरिता तेली समाजातील पुरुष, महिला, युवक-युवती यांनी अथक परिश्रम घेतले.