Homeचंद्रपूरसंविधानाची अंमलबजावणी करणाऱ्यांना संसदेत पाठवा.. ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांचे...

संविधानाची अंमलबजावणी करणाऱ्यांना संसदेत पाठवा.. ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांचे प्रतिपादन.. दिवंगत खासदार बाळू धानोरकर अभ्यासिकेचे लोकार्पण..

चंद्रपूर : दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या नावाने अभ्यासिका सुरू करण्यात आली. निश्चितच हा अभिनंदनीय उपक्रम आहे. या अभ्यासिकेमुळे अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याची सुविधा होणार आहे. अभ्यासिका ही संविधान वाचन करणारे केंद्र आहे. मागील काही वर्षांत संविधान धोक्यात आल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संविधान वाचवायचे असेल, तर संविधानाची अंमलबजावणी करणारे संसेदत पाठवावे लागेल, असे प्रतिपादन दिल्ली येथील ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांनी केले.

शहरातील भिवापूर वॉर्डात जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गणपर्व चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून दिवंगत खासदार बाळू धानोरकर अभ्यासिकेची निर्मिती करण्यात आली आहे. या अभ्यासिकेचा उद्घाटन सोहळा शनिवारी (ता. १९) दुपारी ४ वाजता स्थानिक भिवापूर वॅार्डातील साई मंदिरात पार पडला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, उद्घाटक म्हणून आमदार प्रतिभा धानोरकर, तर प्रमुख अतिथी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा आमदार सुभाष धोटे, आमदार किशोर जोरगेवार, आमदार सुधाकर अडबाले, माजी आमदार देवराव भांडेकर, भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर, चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, शिवसेनेचे (उबाठा) जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे, लोकजागृती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अनिरुद्ध वनकर यांची उपस्थिती असणार आहे.
संसदेत देशभरातील अनेक खासदार येतात. यातील अनेक खासदारांशी माझा जवळचा संबंध आला आहे. बहुतांश खासदार आपल्या क्षेत्रातील प्रश्नसुद्धा उपस्थित करीत नाही. आपल्या मतदार संघाचा विकास व्हावा, रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या, उद्योग उभारले जावे, अशी अपेक्षा ठेवून काम करणारे खासदार बोटावर मोजता येईल एवढे असतात. त्यात चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचा अग्रक्रमाने समावेश होतो. पहिल्यांदा निवडून आलेल्या बाळू धानोरकर यांना आपल्या क्षेत्रासाठी झटताना मी स्वता जवळून बघितले असल्याच्या अनेक आठवणी वानखेडे यांनी यावेळी सांगितल्या.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी, युपीएससी, एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विदर्भातील विद्यार्थ्यांचा टक्का खूप कमी होता. त्यात पश्चिम महाराष्ट्र आघाडीवर होता. मात्र, मागील काही वर्षांत विदर्भाची टक्केवारी वाढली आहे. त्यासाठी अशाप्रकारच्या अभ्यासिका कारणीभूत ठरल्या आहेत. खासदार बाळू धानोरकर यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या अभ्यासिकेमुळे भिवापूर प्रभागातील बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी हक्काची जागा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे सांगितले. आमदार प्रतिभा धानोरकर यांनी, खासदार बाळू धानोरकर यांचे सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय असे काम आहे. प्रत्येक घरातील मुलगा-मुलगी शिकली पाहिजे, असे ते नेहमी म्हणायचे. आपल्या लोकसभा क्षेत्रात अभ्यासिका सुरू करण्याचे त्यांचे स्वप्न होते. हाच विषय गोपाल अमृतकर, गोविल मेहरकुरे यांनी खासदार साहेबांसमोर ठेवला. त्यानंतर जागा बघण्याचे ठरले. मात्र, नियतीला मान्य नव्हते. आणि खासदार साहेब आपल्यातून निघून गेले. मात्र, आज या अभ्यासिकेच्या माध्यमातून त्यांच्या स्वप्नपूर्तीची मुहूर्तमेढ रोवल्या जात असल्याचे सांगितले.
आमदार किशोर जोरगेवार यांनी, चंद्रपूर विधानसभा मतदार संघात अभ्यासिका माझ्या माध्यमातून सुरू करण्यात येत आहेत. यासुद्धा अभ्यासिकेला आता पुस्तके उपलब्ध करून दिले आहेत. भविष्यात २५ लाख रुपयांचा निधीसुद्धा उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. आमदार सुधाकर अडबाले यांनी, चंद्रपूर शहरात आणि जिल्ह्यातील मोठ्या शहरांमध्ये अभ्यासिका सुरू आहेत. परंतु, डिजिटल अभ्यासिकांची संख्या कमी आहे. त्यामुळे भविष्यात ही अभ्यासिका डिजिटल करण्यासाठी मदत करणार असल्याचे सांगितले. प्रास्ताविक गोपाल अमृतकर यांनी केले. संचालन आरती दाचेवार यांनी, तर आभार गोविल मेहरकुरे यांनी मानले. कार्यक्रमाला शहरातील गणमान्य नागरिक, विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

*कोटकरांचे सभागृह अन् अमृतकर, मेहरकुरेंचा पुढाकार*

चंद्रपूर शहरातील अभ्यासिकामध्ये भिवापूर वॉर्डातील विद्यार्थीसुद्धा स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी जातात. मात्र, येथील विद्यार्थ्यांना वॉर्डातच अभ्यासिकेची सोय उपलब्ध करून देण्याचा विचार गोविल मेहरकुरे यांच्या मनात आला. त्यानंतर मेहरकुरे यांनी हा प्रस्ताव गोपाल अमृतकर, अशोक कोटकर यांच्याकडे ठेवला. विद्यार्थी हिताचा विषय असल्याने कोटकर यांनी सभागृह उपलब्ध करून देण्याचे मान्य केले. यानंतर अमृतकर, मेहरकुरे यांनी अवघ्या १५ दिवसांत शहरातील काही दानशुरांच्या मदतीने अभ्यासिका उभी केली. यामुळे या त्रिमूर्तींचे वॉर्डातील नागरिकांकडून अभिनंदन केले जात आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!