चंद्रपूर: रुग्णालयात सेवा देत असताना परिचारिकेची शुद्ध हरपली. त्यानंतर तिला तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, योग्य उपचार न मिळाल्याने त्या परिचारिकेचा मृत्यू झाला. ही घटना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शुक्रवारी (ता. १८) सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकारानंतर संतप्त कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात कामबंद आंदोलन केले. या घटनेला जबाबदार असलेल्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित करण्यात येऊन चौकशी करण्यात यावे अशी मागणी आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी केली आहे. सीमा मेश्राम असे मृत परिचारिकेचे नाव आहे.
चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सीमा मेश्राम या परिचारिका म्हणून कार्यरत होत्या. १६ ऑगस्टला रात्रपाळीत त्या प्रसुती वॉर्डात कर्तव्यावर होत्या. कर्तव्यावर असताना रात्री २.१५ वाजताच्या सुमारास सीमा मेश्राम यांना अचानक भोवळ आली. त्यामुळे त्यांना तातडीने अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, सीमा मेश्राम यांना आवश्यक वैद्यकीय उपचार करण्यात आले नाही. त्यामुळे तिला जीव गमवावा लागला. रात्री सव्वा दोन वाजेपासून, तर सकाळी नऊ वाजेपर्यंत या कालावधीत तपासणी करून योग्य निदान झाले नाही. त्यामुळे सीमा मेश्राम हिला जीव गमावला लागला, असा आरोप करीत महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना, महाराष्ट्र नर्सेस संघटना, महाराष्ट्र राज्य कर्मचारी मध्यवर्ती शाखा चंद्रपूरच्या सर्व पदाधिकारी, कर्मचारी व सदस्यांनी कामबंद आंदोलन केले.
वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने तातडीने या प्रकाराला जबाबदार असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित करून चौकशी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. सीमा मेश्राम यांचा मृत्यू हा निष्काळजीपणातून झाला आहे. या घटनेतून रुग्णालयातील भोंगळ कारभार समोर आला आहे. याकडे वरिष्ठांनी तातडीने लक्ष देण्याची आवश्यकतासुद्धा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
—
परिचारिकेच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करा
चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे वेळेवर वैद्यकीय उपचार न मिळाल्याने परिचारिका सीमा मेश्राम यांना आपला जीव गमवावा लागला. शासकीय रुग्णालयात सर्वसामान्य नागरिकांना वेळेवर वैद्यकीय उपचार मिळत नाही, असा आरोप अनेकदा केला जातो. आता त्याच रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारिकेला उपचाराअभावी जीव गमवावा लागतो, या घटनेतून रुग्णालयातील भोंगळ कारभार समोर आला आहे. त्यामुळे या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून दोषी वैद्यकीय अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या सोयी सुविधांकडे सत्ताधाऱ्याचे लक्ष नाही, पालकमंत्री आढावा घेत नाहीत. वैद्यकीय अधिकारी कोणालाच जुमानत नाही, अशी स्थिती निर्माण झाल्याने सामान्य माणसांच्या आरोग्याचे हाल होत आहे. रुग्णांची दुर्दशा ही चिंतेची बाब असून, रात्रपाळीत वैद्यकीय अधिकारी का उपलब्ध नव्हते, तज्ञ्ज डॉक्टर कुठे गेले होते, रात्रभर मृत्यूशी झुंज देणाऱ्या परिचारिकेची का तपासणी झाली नाही, या घटनेची आरोग्यमंत्र्यांनी चौकशी करावी, अशीही मागणी तिवारी यांनी केली आहे.








