बाबासाहेबांच्या संविधानामुळेच भारतावर जगाची आशा- पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांचे प्रतिपादन…

251

नागपूर -आज संपूर्ण जग युद्धाच्या खाईत लोटले जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी जगाची आशा भारतावर आहे. कारण या देशाचा पाया संविधानामुळेच मजबूत झाला आहे आणि मोठ्यात मोठ्या समस्येचे उत्तर बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानातच आहे, असे प्रतिपादन गडचिरोली क्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक ज्येष्ठ आयपीएस अधिकारी संदीप पाटील यांनी केले.

माजी सनदी अधिकारी इ. झेड. खोब्रागडे यांनी नागपूर जिल्हा परिषदेचे सीईओ असताना २००५ मध्ये सुरू केलेला संविधान प्रास्ताविकेचे शाळांमधून वाचन व २६ नोव्हेंबर-संविधान दिन या देशातील पहिल्या ‘संविधान ओळख’ उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे कार्य करणाऱ्या जागरूक नागरिक/जबाबदार सामाजिक संस्था/मीडिया प्रतिनिधी यांना डॉ. भीमराव रामजी आंबेडकर संविधान सन्मानाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह (बानाईचे सभागृह), उरुवेला कॉलनी, वर्धा रोड, नागपूर येथे गुरुवार दि. १५ जून २०२३ रोजी दुपारी ३.०० वा. पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील (भापोसे) यांच्या हस्ते वितरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

माजी सनदी अधिकारी व संविधान फाऊंडेशनचे संस्थापक इ. झेड. खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न या देखण्या सोहळ्याला ज्येष्ठ नाटककार व आंबेडकराईट मुव्हमेंट ऑफ कल्चर अँड लिटरेचर या संस्थेचे अध्यक्ष दादाकांत धनविजय, शिरीष कांबळे व संविधान फाऊंडेशनच्या रेखाताई खोब्रागडे प्रामुख्याने उपस्थित होत्या.

पुढे बोलताना संदीप पाटील म्हणाले की, भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे, हे केवळ संविधानातील राष्ट्रनिर्माणाच्या विचारामुळेच शक्य झाले आहे. गडचिरोली आणि इतर भागात माओवादी गरिबांसाठी लढा देत नाही तर देशविघातक सत्तेसाठी देत आहेत. त्यांना बंदुकीच्या जोरावर क्रांती करायची आहे. मात्र जगातील सर्वात मोठी क्रांती बाबासाहेबांनी लेखणीच्या बळावर केली, हे भारतीयांनी कदापि विसरता कामा नये. माओ कोण होता? माओचा विचार भारतासारख्या लोकशाहीप्रदान देशात कदापि लागू होत नाही. आंबेडकरी विचारांसमोर माओची काय बिशाद? आज देशविघातक शक्ती सोशल मीडियाच्या मदतीने संविधान आणि लोकशाहीला अपयशी ठरविण्याच्या कट रचत आहेत. अशा देशविघातक शक्तींचा नायनाट करण्यासाठी बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाच्या विचारांची फौज निर्माण होणे गरजेचे आहे, असे विचार संदीप पाटील यांनी यावेळी मांडले. ज्येष्ठ नाटककार दादाकांत धनंजय यांनी बहुजन समाजाला संघटित होऊन सामाजिक व आर्थिक न्यायासाठी संघर्ष करण्याचे आवाहन केले. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व व न्याय या तत्त्वप्रणालीचा भारत देश घडविण्यासाठी सर्वप्रथम देशातला माणूस घडविणे गरजेचे असल्याचे विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले. माजी सनदी अधिकारी इ. झेड. खोब्रागडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संविधान जागराची चळवळ ही राष्ट्रनिर्माणाची लोकचळवळ असून संविधानाच्या विचारांच्या प्रचार-प्रसारासाठी ‘नाही रे’ वर्गापर्यंत जाऊन संविधान त्यांच्या वस्तीत कसे पोहोचेल यासाठी शासन-प्रशासन व्यवस्थेच्या संविधाननिष्ठ प्रामाणिक प्रयत्नांची गरज असल्याचे विचार व्यक्त केले.

संविधान ओळख उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी व संविधानाच्या जाणीव जागृतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारे सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था-संघटना व प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी यांना डॉ. भीमराव रामजी आंबेडकर संविधान सन्मानाने गौरवांकित करून त्यांचे प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संविधान फाऊंडेशनने हा सामाजिक उपक्रम कार्यान्वित केला असून या उपक्रमाचे हे तिसरे वर्ष आहे. दि. १५ जून २०२३ रोजी उरुवेला कॉलनी येथील बानाईच्या सभागृहात संपन्न या दिमाखदार सोहळ्यात अतुल सतदेवे (संविधान मैत्री संघ, गोंदिया), प्रा. युवराज खोब्रागडे (भंडारा), सुरज दहागावकर (चंद्रपूर), प्रा. नूतन माळवी (वर्धा), अशोक कोल्हटकर (नागपूर), रुबीना पटेल (नागपूर), एड. अंजली साळवे (नागपूर), महेश मडावी (अहेरी, गडचिरोली), पत्रकार देवेश गोंडाणे (लोकसत्ता, नागपूर), प्रा. राहुल मून (संविधान परिवार), सम्यक थिएटर नागपूर, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा- नागपूर जिल्हा, जागृत नागरिक मंच नागपूर, दीनबंधू शिक्षण व सामाजिक संस्था नागपूर, मैत्रिणी ग्रुप, बानाई, प्रफुल शेंडे (संविधान रक्षक दल), वैभव शिंदे पाटील (एक वादळ भारताचं), वंचित समूहाचे प्रतिनिधी खुशाल ढाक, रमेश धुमाळ, तुफान उईके, विशाल शुक्ला, रतनसिंह बावरी, जमीरभाई मदारी व प्रीती हजारे यांना सन्मानपत्र व इ. झेड. खोब्रागडे लिखित ‘आपले संविधान’, ‘संविधान ओळख’ व डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे ‘लॉकडाऊन’-कवितासंग्रह या पुस्तकांचा संच देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवांकित करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संविधान फाऊंडेशनच्या रेखाताई खोब्रागडे यांनी केले. सूत्रसंचालन अल्का निरंजन यांनी केले. प्रारंभी छाया मेश्राम यांनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले. सन्मानपत्राचे वाचन दीपक निरंजन यांनी केले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन दिगंबर गोंडाणे यांनी केले. राष्ट्रगीताने सन्मान सोहळ्याची सांगता झाली. या सन्मान समारंभास नागपूर विभागातील सामाजिक संस्था, सामाजिक संघटना, कर्मचारी-अधिकारी संघटना, शाळा-महाविद्यालयाचे प्रतिनिधी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, शिक्षक-प्राध्यापक, वकील, डॉक्टर्स, इंजिनियर्स, सामाजिक सांस्कृतिक साहित्याचे क्षेत्रातील मान्यवर मंडळी, संविधान मित्र, संविधान दूत व संविधान प्रेमी नागरिक मित्र परिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रेखा खोब्रागडे, डॉ. महेंद्रकुमार मेश्राम, दीपक निरंजन, दिगंबर गोंडाणे, शिरीष कांबळे, नेहा खोब्रागडे, विजय बेले, अल्का निरंजन, कल्पना कांबळे, अतुलकुमार खोब्रागडे, विजय कांबळे, सुधामती अवथरे, विभा कांबळे व छाया मेश्राम यांनी अथक परिश्रम घेतले.