कचऱ्यात आढळले मृत अर्भक वरोरा येथील घटना….

1002

वरोरा : येथील बसस्थानकानजीक असलेल्या आयटीआयच्या प्रांगणात बुधवारी (ता. ७) सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान सहा ते सात महिन्याचे स्त्री जातीचे मृत अर्भक आढळून आले. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृत अर्भक ताब्यात घेतले. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून कचऱ्यात अर्भक फेकणाऱ्यांचा शोध सुरू केला आहे. सायंकाळच्या सुमारास एसटी बसस्थानक व आयटीआयच्या सुरक्षा भिंतीजवळ मृत अर्भक आढळून आले. त्यानंतर सुरक्षारक्षकाने या घटनेची माहिती वरोरा पोलिसांना दिली. पोलिसांनी मृत अर्भक ताब्यात घेत उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे दाखल केले. अर्भक हे स्त्री जातीचे असून, सहा ते सात महिन्याचे असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे फॉरेन्सिक लॅब नसल्यामुळे पुढील तपासणीकरिता चंद्रपूर येथील रुग्णालयात अर्भक पाठविण्यात आले आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध वरोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांनी दिली.