Homeचंद्रपूरलढवय्ये नेतृत्त्व....खासदार मा.स्व.बाळूभाऊ धानोरकर

लढवय्ये नेतृत्त्व….खासदार मा.स्व.बाळूभाऊ धानोरकर

चंद्रपूर: एका सामान्य शिक्षकांचा मुलगा ते काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचा राजकीय प्रवास विलक्षण आहे. जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही. तोपर्यंत आपल्याला हरवू शकत नाही. हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्की. संकटातसुद्धा शांत राहून यश मिळविता येते याचा वास्तूपाठ घालून देणारा आहे. राजकीय पार्श्वभूमी नसतानाही अनेकांनी राजकारणात यश मिळविले आहे. या यशस्वी नेत्यांचा प्रवास आणि खासदार बाळू धानोरकरांची वाटचाल यात तुलनात्मक फरक आहे. त्यामुळे धानोरकरांनी मिळविलेले राजकीय यश इतरांच्या तुलनेत काकणभर अधिक आहे. बाळू धानोरकर एका शिक्षकाचा मुलगा. मुलाने शिकून नोकरी मिळवावी आणि कुटुंबाची जबाबदारी स्वीकारावी एवढीच माफक अपेक्षा मध्यवर्गीय कुटुंबातील पालकांची असते. त्यांच्या वडिलांचीसुद्धा यापेक्षा वेगळी अपेक्षा नव्हती.

बाळू धानोरकरांना शिक्षणात गती होती. परंतु नव्याचा ध्यास, नव करण्याची ओढ, त्यांना खुणावत होती. तरुण वयात शिवसेनेकडे ते ओढले गेले. तिथे सक्रिय झाले. माणसं जोडण्याची कला आणि स्पष्टवक्तेपणा आणि आक्रमकता हे त्यांच्यातील गुण पक्ष नेतृत्वाने ओळखले. त्यांच्यावर जिल्हा शिवसेनेची जबाबदारी दिली. कोणताही प्रश्न त्वरित निकाली काढण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे ते तरुण वर्गात लोकप्रिय झाले. जनसामान्यांना त्याचे आकर्षण वाटायला लागले. विधानसभेची पहिली निवडणूक अवघ्या दीड हजार मतांनी हरले. ते निराश झाले नाही. पराभव विसरुन दुसऱ्याच दिवशी ते शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरले. त्यांची वाढती लोकप्रियता प्रस्थापितांना सहन झाली नाही. त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई झाली. त्यावेळी कठीण प्रसंगात त्यांनी आपला तोल ढळू दिला नाही. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी समोर मंत्री रिंगणात असताना पराभव केला.

राज्यात युतीचे सरकार आले. धानोरकर शिवसेनेचे आमदार होते. नवखे आमदार असतानाही त्यांनी स्वतः च्या सरकारवर टीका करायला मागे पुढे बघितले नाही. निर्णय जनहिताचे नसेल तर धानोरकर पेटून उठतात, हे त्यांनी अनेकदा दाखवून दिले. स्थानिक राजकारणाला कंटाळून शिवसेना सोडली. लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. परंतु त्यांच्या तिकीटाचे विलक्षण नाट्य रंगले. त्यांची राजकीय कारकिर्दच संपविण्याचा खेळ सुरू झाला. यावेळीही डगमगले नाही. हरलेली बाजी ते जिंकले. तिकीट मिळाली. पंधरा दिवसात ते काँग्रेसचे खासदार झाले आणि इतिहास घडविला. राज्यात ते एकमेव काँग्रेसचे खासदार म्हणून निवडून आले. संधी मिळत नाही ती मिळवावी लागते, हे त्यांनी दाखवून दिले. निवडणूक जिंकण्याचे तंत्र त्यांनी चांगलेच अवगत केले आहे. जवळची माणस विरोधात गेली असतानाही विधानसभा निवडणुकीत पत्नीला काँग्रेसची उमेदवारी मिळवून दिली. त्यांना बहुमताने निवडून आणले. आता धानोरकर दांम्पत्य खांद्याला खांदा लावून लोकसेवा करीत आहे.

या राजकारणाच्या धावपळीत आईवडीलांची भूमिका ते चोख बजावित आहे. दोन्ही मुल, आईवडिलांकडे त्यांचे तेवढेच लक्ष असते. कार्यकर्त्यांनीसुद्धा ते मुलांप्रमाणेच जपतात. त्यांच्या आजवरच्या यशात त्यांच्या स्पष्टवक्तेपणाची किंमतही त्यांना अनेकदा मोजावी लागली. जवळची माणस नाराज झाली. काही तुटली. परंतु माणस जोडण्याची आणि हेरण्याची विलक्षण कला त्यांच्यात आहे. एखाद्याला रागविल्यानंतर त्याला मायेनं जवळ घेण्याचा मोठेपणा त्यांच्याजवळ आहेत. कठीण परिस्थितीतूनही ते मार्ग काढतात. त्यामुळे कुणीच त्यांचा दीर्घकाळ शत्रू राहात नाही. अनेक विरोधी पक्षातील लोक त्यांचे मित्र आहे. प्रत्येक क्षेत्रातील बड्या लोकांशी त्यांचे संबंध चांगले आहेत. त्यामुळे ते प्रत्येकाचे ‘बाळूभाऊ’ झाले आहे. आपल्या क्षेत्रात उद्योग आले पाहिजे.

तरुणांच्या हाताला काम मिळायला हवे म्हणून ते नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यांच्या कार्यालयात येणारा त्यांना भेटणारा माणूस कधीच निराश होऊन जात नाही. एखाद्या योग्य कामासाठी ते अनेकदा आक्रमकसुद्धा होतात. त्यावेळी कुणाचीही ते पर्वा करीत नाही. जनतेची काम महत्वाची आहे. माझ्यावर टीकाटिप्पणी झाली तरी चालेल, अशी त्यांची भूमिका असते. त्यामुळे अनेकदा त्यांच्यावर टीका होते. टीका-टिप्पणीकडे दुर्लक्ष करुन आलेल्या माणसांचे काम केले. याचे त्यांना समाधान असते. खासदार झाल्यानंतर जगभरात एका संकटाची महाराष्ट्र त्याला अपवाद नव्हता. कोरोनाने जनजीवन विस्कळित झाले. टाळेबंदी लागली. लोकांना रुग्णालयात चाहूल लागली. बेड मिळत नव्हते. माणसं एकमेकांच्या जवळ जायला घाबरायची. सारे लोकप्रतिनिधी जेव्हा घरात लपून बसले. तेव्हा खासदार धानोरकर स्वतः पीपीई किट घालून रुग्णालयात फिरत होते.

लोकांसाठी स्वतःच्या जीवाचीही परवा केली नाही. याच धावपळीत धानोरकर दांमप्त्याला कोरोनाची लागण झाली. परंतु जनतेचा आशीर्वाद पाठीशी असल्याने कोरोनाही त्यांचे काही बिघडवू शकला नाही. यातून बरे झाल्यानंतर तेवढ्याच ताकदीने पुन्हा ते कामाला लागले. आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलायची तयारी ठेवावी लागते, याची कल्पना त्यांना आहे. त्यामुळे ते कार्यकर्त्यांना नेहमीच सांगतात संकटोवर अशा रितीने तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच… हेच त्यांच्या आजवरच्या यशाचे गुपित आहे. कर्तृत्व, नेतृत्व आणि वकृत्व या गुणांचे धनी असलेल्या या लोकनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली….चंद्रपूरचे खासदार मा. बाळुभाऊ धानोरकर यांच्या निधनाने सर्वत्र शोकाकुल वातावरण झाले आहे…त्यांच्या आत्म्याला शांती लाभो भावपूर्ण श्रद्धांजली…💐💐

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!