अविनाश पोईनकर यांना जिल्हा युवा पुरस्कार – ग्रामीण विकास व सामाजिक कार्याची दखल

426

चंद्रपूर :महाराष्ट्र शासनाच्या क्रिडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात येणारा सन २०२०-२१ चा जिल्हा युवा पुरस्कार कोरपना तालुक्यातील बिबी येथील प्रसिद्ध कवी, मुक्तपत्रकार व युवा सामाजिक कार्यकर्ते अविनाश पोईनकर यांना प्रदान करण्यात आला. महाराष्ट्रदिनी जिल्हा पोलिस मुख्यालयाच्या परेड ग्राऊंडवर ध्वजारोहण सोहळ्यात वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय तथा पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते अविनाश पोईनकर यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व रोख दहा हजार रुपये देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जाॅन्सन, जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी, जिल्हा क्रिडा अधिकारी अविनाश पुंड व मान्यवरांची विशेष उपस्थिती होती.

जिल्ह्यात समाज हितोपयोगी व युवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवकांना शासनाद्वारे सन्मानित करण्यात येते. ग्रामीण भागातील अविनाश पोईनकर हे मागील दशकभरापासून सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, पत्रकारिता, ग्रामीण विकास, संविधानिक मुल्ये, आदिवासी व युवक चळवळीत सक्रिय कार्यरत आहे. या अगोदर ग्रामपरिवर्तक म्हणून चंद्रपूरातील घाटकुळ ग्रामपंचायतीला राज्यात आदर्श ग्राम व जिल्हा स्मार्ट व सुंदर गाव पुरस्कार मिळवून देत ग्रामीण विकासात उत्कृष्ठ कार्य केले आहेत. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात आदिम माडिया व कोलाम समुदायाचे हक्क, संस्कृती यावर संशोधनात्मक लेखन तसेच पेसा, वनाधिकार कायद्याच्या अंमलबजावणीसाठी विशेष कार्यरत आहे. अक्षर साहित्य कला प्रतिष्ठान, जागृत संस्था, ग्रामदूत फाऊंडेशन, डॉ.गिरीधर काळे सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून ते राबवत असलेले विविध उपक्रम युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. मागील तीन वर्षांचे युवा पुरस्कार यंदा एकत्र प्रदान करण्यात आले. सन २०१९-२० चा मयूर चहारे तर २०२१-२२ चा अनिकेत दुर्गे यांनाही सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला.