HomeBreaking Newsतेव्हा "दारू विरुद्ध दूध" च्या लढाईत दारू जिंकली होती पण आता?

तेव्हा “दारू विरुद्ध दूध” च्या लढाईत दारू जिंकली होती पण आता?

चंद्रपूर – पूर्व विदर्भातील चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर देशभर चर्चेत आला. त्याला कारणही तसंच होतं. नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या जोरदार लाटेत कॉंग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर निवडून आले होते.

महाराष्ट्रातून निवडून आलेले कॉंग्रेसचे ते एकमेव खासदार ठरले. मात्र मागील चार वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. त्यामुळे २०२४ची निवडणूक धानोरकरांना मागील निवडणुकीयेवढी सोपी नाही, असे राजकीय जाणकार सांगतात. (For Dhanorkar this election is not as easy as last election)

चंद्रपूर लोकसभा मतदार संघात भाजपचा उमेदवार कोण असेल, हे अद्याप स्पष्ट नाही. सन २०१९ निवडणुकीत ओबीसीचे समीकरण धानोकरांच्या पथ्यावर पडले. मुळात देशभरात भाजपने मोदींच्या चेहऱ्यावर निवडणूक लढली. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ त्याला अपवाद ठरला. धानोरकर यांचा दारूविक्रीचा व्यवसाय आहे. अहिर यांनी कधीकाळी दूध विकले आहे. त्यामुळे भाजपने मतदारांसमोर जाण्यासाठी दारू विरुद्ध दूध अशी रणनीती आखली. मात्र तीच त्यांच्यावर उलटली.

पाच वर्ष चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी होती. धानोरकर दारूबंदी उठविण्याच्या बाजूने होते. जाहीर सभेत यावर खुलेआम बोलत. त्याचा परिणाम म्हणून दारूबंदी असलेल्या चारही मतदार संघांत धानोरकरांना मोठे मताधिक्य मिळाले आणि विजयाचा मार्ग सुकर झाला. शिवसेनेतून कॉंग्रेसमध्ये प्रवेश करताना त्यांच्या उमेदवारीचे नाट्य रंगले याचाही फायदा धानोरकरांना झाला. केंद्रीय मंत्री असतानाही अहिरांची निष्क्रियता मतदारांच्या नाराजीचे कारण ठरली.

भाजपच्या एका गटाने धानोरकरांना निवडणुकीत मदत केली, अशी चर्चा होती. अहिर यांनीही अप्रत्यक्षपणे यावर भाष्य केले आहे. महाराष्ट्रात कॉंग्रेसचे खासदार म्हणून धानोरकर एकटेच निवडून आले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर विजयी झाल्या. लागोपाठ विजयाने धानोरकरांचा आत्मविश्वास वाढला. त्यानंतर त्यांनी थेट मोदींना आव्हान दिले. वाराणसीमध्ये जाऊन मोदींना आव्हान देण्याचाही प्रयत्न त्यांनी केला. निवडणुका कशा लढायच्या आणि जिंकायच्या कशा, हे आम्हांला माहीत आहे, असे ते नेहमीच बोलत असतात.

खासदारकीनंतर दोन वर्ष कोरोनात गेले. त्यानंतर जनजीवन सुरळीत झाले. मात्र धानोकरांचा लोकांपासून दूर राहण्याची कोरोना काळातील सवय मात्र सुटली नाही. त्यामुळे त्यांच्याविषयी मतदारांत नाराजी आहे, याबाबत कॉंग्रेसच्या वर्तुळातच चर्चा रंगतात. अनेक जुने सहकारी त्यांच्यापासून दूर झाले आहेत. जिल्ह्यात आमदार विजय वडेट्टीवार, आमदार सुभाष धोटे, अपक्ष आमदार किशोर जोरगेवार, माजी आमदार वामनराव चटप, सुदर्शन निमकर सन २०१९ च्या निवडणुकीत ताकदीने धानोरकरांच्या पाठीशी होते.

सन २०२४च्या निवडणुकीत यांपैकी एकही धानोरकरांच्या सोबत राहणार नाही, अशी स्थिती दिसते आहे. त्यामुळे त्यांना लोकसभा निवडणुकीला एकटेच समोर जावे लागणार की काय, अशी शंका येते. भाजप विरोधात मतदारांमध्ये वाढत असलेला असंतोष, राहुल गांधींची उंचावत असलेली प्रतिमा आणि महाविकास आघाडीची वज्रमूठच धानोरकरांच्या विजयाचा मार्ग सुकर करू शकते. कारण यावेळी ‘दारू विरुद्ध दूध’ हा मुद्दा नाही, हेसुद्धा धानोरकरांना लक्षात ठेवावे लागेल.

भाजप नेते हंसराज अहिर १९९६, २००४, २००९ आणि २०१४ सालच्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांत विजयी झाले. केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि रसायन व खते या खात्याचे राज्यमंत्रीही राहिलेले आहेत. मात्र २०१९ सालच्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा झटका बसला. त्यानंतर ते अडगळीत पडतील, असे सांगितले जात होते. पण त्यांनी मतदारसंघातील संपर्क तुटू दिला नाही. गेल्या वर्षी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्षपद देऊन भाजपने त्यांना लोकसभेसाठी ताकद दिल्‍याचे सांगितले जाते. पण लोकसभेची उमेदवारी त्‍यांना देणे शक्य नसल्याने ते पद देण्यात आल्याचाही एक मतप्रवाह आहे.

अहिरांना उमेदवारी द्यायची नाही, असे ठरल्यास महाराष्ट्राचे विद्यमान वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पर्याय भाजपसमोर आहे. पण मुनगंटीवार महाराष्ट्र सोडून दिल्लीत जाण्यास इच्छुक नाहीत, असे भाजपच्या गोटातील काहींचे म्हणणे आहे. पण अहिर की मुनगंटीवार, याचे उत्तर येणारा काळच देणार आहे. दुसरे कारण शोधले असता असे लक्षात येते की, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीप्रमाणे लोकसभेच्या निवडणुकीत ओबीसींची हवा चालली तर अडचण होऊ शकते. त्यामुळे सुधीर मुनगंटीवार सध्यातरी लोकसभा निवडणूक लढवण्याच्या फंदात पडणार नाही, असे वाटते.

ओबीसी कार्ड चालल्यास मुनगंटीवारांना फटका बसू शकतो. पण पक्षाने आदेश दिल्यास त्यांना लढावेच लागेल, हेही तेवढेच खरे. अशा वेळी सलग सहा वेळा आमदार राहिलेले आणि तीन वेळा कॅबिनेट मंत्री (१९९९मध्ये पर्यटन व ग्राहक संरक्षण मंत्री, २०१४ ते २०१९ वने आणि अर्थमंत्री आणि २०२२पासून आतापर्यंत वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री) असताना त्यांनी आजवर जमवलेला जनाधार त्यांच्या मदतीला येणार आणि ते तुल्यबळ लढत देणार. हाच जनाधार मुनगंटीवारांना विजयाच्या दारापर्यंत घेऊन जाऊ शकतो, असेही जाणकार सांगतात.

देवराव भोंगळेंना मैदानात उतरवणार ?
आगामी काळात महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) वज्रमूठ आणि ओबीसीची हवा वाढली. तर भाजपला ओबीसी चेहरा पुढे करावा लागणार आहे. अशावेळी भाजपचे (BJP) जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांना मैदानात उतरविले जाईल, याची शक्यता आहे. देवराव भोंगळे यांनी सरपंचपदापासून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. ते चंद्रपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि बांधकाम सभापती राहिलेले आहेत आणि सध्या भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत.

भोंगळे लोकसभेचा चेहरा सध्यातरी मानले जात नाहीत. पण मुनगंटीवारांचे (Sudhir Mungantiwar) ते अत्यंत विश्‍वासू आहेत. त्यामुळे त्यांना निवडून आणण्यासाठी मुनगंटीवार पूर्ण जोर लावतील, हे निश्‍चित. लोकसभा लढणार की राज्याच्याच (Maharashtra) राजकारणात सक्रिय राहणार याबाबतीत सुधीर मुनगंटीवार आजवर स्वतः कधी खुलून बोललेले नाहीत.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!